पिंपरी : नागरिकांनो कानाचे पडदे सांभाळा..! शहराच्या ध्वनिपातळीने ओलांडली मर्यादा | पुढारी

पिंपरी : नागरिकांनो कानाचे पडदे सांभाळा..! शहराच्या ध्वनिपातळीने ओलांडली मर्यादा

वर्षा कांबळे

पिंपरी(पुणे) : पिंपरी-चिंचवड महापालिकेचा पर्यावरण सद्यःस्थितीचा 2022-23 चा अहवाल नुकताच प्रसिद्ध झाला आहे. या अहवालात शहरातील विविध भागांतील ध्वनिप्रदूषणाची आकडेवारी देण्यात आली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळाने ठरवून दिलेल्या क्षेत्रनिहाय ध्वनिस्तर प्रमाणाची मर्यादा शहरातील विविध भागांत ओलांडली असल्याचे त्यातून स्पष्ट होते. औद्योगिक आणि व्यावसायिक परिसरामध्ये ध्वनिप्रदूषण घटले असून, या उलट निवासी भागांमध्ये वाढल्याचे महापालिकेच्या पर्यावरण अहवालामधून दिसून येत आहे.

व्यावसायिक भागात दिवसा ध्वनिपातळी 65, तर रात्री 55 डेसिबल असणे अपेक्षित आहे. ही पातळी 60 डेसिबलच्या आसपास आहे, तर औद्योगिक क्षेत्रात दिवसा 75 व रात्री 70 डेसिबल्स इतकी ध्वनिमर्यादा हवी. परंतु, यात चांगली घट झाली असून, 60 ते 64 इतकी ध्वनिपातळी आहे. दुसरीकडे निवासी भागांमध्ये दिवसा 55, तर रात्री 45 डेसिबल इतकी ध्वनिमर्यादा हवी. मात्र, शहरातील विविध निवासी भागांमध्ये ध्वनीची सरासरी पातळी 60 ते 67 डेसिबल इतकी आढळून आली आहे.

शहरामध्ये वाहतूक, वाहतूक कोंडी, मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकाचा वापर, विविध उत्सव, कार्यक्रम, बांधकाम ही ध्वनिप्रदूषणाची मुख्य कारणे आहेत. ध्वनिपातळी चाचण्यांवरून विशिष्ट ठिकाणी जसे मुख्य चौक, रस्ते आदी ठिकाणी सण व उत्सवाच्या कालावधीत ध्वनिपातळी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या निर्धारित मानांकनापेक्षा वाढलेली दिसून येते.

रस्ते वाहतूक व दळणवळण

वाढती लोकसंख्या, औद्योगिकीकरण, रोजगाराच्या विविध संधी आदीमुळे मनपाक्षेत्रात येणारी-जाणारी वाहने, दुचाकी, चारचाकी, प्रवासी आदी वाहनांच्या शहरातील रस्त्यावरून होणार्‍या वाहतुकीमुळे शहरातील मुख्य चौक, रस्ते आदी ठिकाणी वाहतुकीची समस्या निर्माण होत आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा 50 टक्के वाहनांची भर पडली आहे. याचे प्रमाण दरवर्षी वाढत आहे.

सण व उत्सव

शहरात गणेशोत्सव, दहीहंडी, दिवाळी या काळात मोठ्या प्रमाणात ध्वनिप्रदूषण होते. ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळातर्फे शहरातील चार भागांत मुख्य चौकांत ध्वनी मोजण्याचे यंत्र बसविण्यात आले आहे. शहरामध्ये चिंचवड येथील चापेकर चौक, पिंपरी डिलक्स चौक, डांगे चौक व थेरगाव या ठिकाणच्या मुख्य चौकात महाराष्ट्र प्रदूषण नियत्रंण मंडळाने ध्वनिमापक यंत्रणा बसविली आहे. मात्र, पिंपरी-चिंचवड शहराच्या निवासी भागांमध्ये ध्वनिपातळी ही प्रदूषण मंडळाच्या विहित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे पालिकेच्या पर्यावरण विभागाने तयार केलेल्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

उत्सवाच्या काळात ध्वनिपातळी जास्त असते. गणेशोत्सव आणि दिवाळी या काळात ध्वनिपातळी सरासरीपेक्षा जास्त असते. त्या वेळी आम्ही ध्वनिपातळी तपासली आहे.

– संजय कुलकर्णी (सह शहर अभियंता, पर्यावरण अभियांत्रिकी विभाग)

हेही वाचा

महाअधिवेशनात ओबीसी समाजाशी संबंधित ४२ मागण्यांचे ठराव पारित

अहमदनगर : झेडपीच्या नोकरभरतीची निवड समिती नावालाच!

अहमदनगर : तुटलेल्या पुलावरून जीवघेणा प्रवास

Back to top button