‘डी.एड’ साठी नगर जिल्ह्यातून अवघे 515 प्रवेश

‘डी.एड’ साठी नगर जिल्ह्यातून अवघे 515 प्रवेश
Published on
Updated on

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा : राज्यात काही वर्षापासून डी. एड अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांची संख्या झपाट्याने घटत असल्याची दिसून येत आहे. याही वर्षी उपलब्ध असणार्‍या जागेपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले आहेत. अहमदनगर जिल्ह्यातही हिच परिस्थिती आहे. जिल्ह्यातील 1 हजार 150 क्षमता असलेल्या जागांपैकी केवळ 515 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. एकेकाळी महाराष्ट्रात अहमदनगर जिल्हा म्हणजे शिक्षक निर्मितीचा जिल्हा म्हणून ओळखला जात होता. त्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये आज अवघे 515 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. अहमदनगर जिल्ह्यात 26 अध्यापक विद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. 1 हजार 480 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. त्यातील 330 विद्यार्थी हे अनुदानित प्रवेश क्षमतेचे आहेत, तर 1 हजार 150 विद्यार्थी विनाअनुदानित प्रवेश क्षमतेचे आहेत.

महाराष्ट्रात अध्यापक विद्यालय सुरू करण्याची पंधरा ते वीस वर्षे पुर्वी स्पर्धा लागली होती. एक लाखांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता होती. मात्र सध्या शिक्षक भरतीची प्रक्रिया लाल फितीत अडकली. ती अधिक किचकट झाल्यामुळे विद्यार्थ्यांना संधी मिळणे अवघडच झाले आहे. त्यामुळे विद्यार्थी या अभ्यासक्रमाकडे फारसे फिरकत नसल्याचे उघड झाले आहे. महाराष्ट्रात सध्या 16 शासकीय अध्यापक विद्यालय, 97 अनुदानित विद्यालय तर 462 विनाअनुदानित अध्यापक विद्यालय कार्यरत आहेत.

महाराष्ट्रात काही वर्षापासून विद्यार्थी उपलब्ध होत नसल्यामुळे अनेक अध्यापक विद्यालय बंद करण्यात आली आहे. शासनाने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांशी जोडून असलेले डी. एड अभ्यासक्रमाचे वर्ग यापूर्वीच बंद केले आहेत. खासगी विनाअनुदानित संस्थांना देखील विद्यार्थ्यांसाठी धावाधाव करावी लागत असल्यामुळे राज्यातील अनेक अध्यापक विद्यालयांनी यापूर्वीच विद्यालय बंद करण्याचे प्रस्ताव शासनाला सादर केले होते.

मागील वर्षापेक्षा यावर्षी 21 अध्यापक विद्यालयांनी प्रवेश प्रक्रिया थांबवली आहे. खाजगी संस्थांना देखील विद्यार्थी प्राप्त करण्यासाठी विद्यार्थी शोधण्याची वेळ त्यांच्यावरती आली आहेत. महाराष्ट्रात दहा लाखापेक्षा अधिक विद्यार्थी पदवी व पदविका प्राप्त करून नोकरीच्या शोधात आहेत. त्यातच शिक्षण हक्क कायद्याचे अस्तित्वाल्यानंतर डी. एड पात्रतेबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा, संस्था चालकांसाठी मुलाखती यासारख्या प्रक्रियेतून जावे लागत आहे. राज्यातील शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल तीन चार टक्क्यांच्या पुढे जात नाही. शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण नाही म्हणून नोकरीची संधी मिळत नाहीत. अशा दृष्ट चक्रामध्ये विद्यार्थी सापडल्यामुळे डी. एड अभ्यासक्रमाकडील ओढा दिवसेंदिवस कमी होत चालला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षक होण्याकडे कल कमी होत असून विद्याथार्ंना अडचणीचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात पाच अनुदानित अध्यापक विद्यालय असून 21 विनाअनुदानीत अध्यापक विद्यालय सध्या सुरू आहेत. आत्तापर्यंत अहमदनगर जिल्ह्यामध्ये शासकीय कोट्यामधून 508 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. तर व्यवस्थापन कोट्यातून अवघ्या सात विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. आत्तापर्यंत नगर जिल्ह्यात 515 विद्यार्थ्यांनी विद्यालयात प्रवेश घेतले आहेत. राज्यात 31 हजार 207 एवढी जागा संख्या असताना पहिल्या फेरीत अवघ्या 3 हजार 947 विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. प्रवेशासाठी 13 हजार 798 विद्यार्थ्यांनी अर्ज सादर केले आहेत. पहिल्या फेरीत 6 हजार 728 विद्यार्थ्यांची प्रवेश क्षमता आहे. दुसर्‍या प्रवेश फेरीमध्ये 4 हजार 788 जागा मंजूर आहेत, त्यासाठी किती विद्यार्थी पात्र ठरतात हे स्पष्ट होर्ईल.

भरती होईना शिकून करायचे काय?
अध्यापक विद्यालयातून पदवी प्राप्त केल्यानंतर देखील शाळा, विद्यालयांमध्ये भरती होत नाही. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू झाल्यानंतर या संदर्भातील प्रक्रिया आणखी किचकट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमाला प्रवेश घेऊन नोकरी उपलब्ध नसल्याने विद्यार्थी पूर्णतः डोळेझाक करत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news