नेवासा : काळी फीत लावून महसूल दिनात सहभाग ; नायब तहसीलदारांची नाराजी | पुढारी

नेवासा : काळी फीत लावून महसूल दिनात सहभाग ; नायब तहसीलदारांची नाराजी

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  नायब तहसीलदार संवर्गाच्या ग्रेड पे सोबत इतर विविध मागण्या प्रलंबित असल्याने महसूल सप्ताह हा निषेध सप्ताह म्हणून पाळत असून, काळी फीत लावून कामकाज करणार असल्याचे निवेदन नेवासा तहसील कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी तहसीलदार संजय बिरादर यांना दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, नेवासा कार्यालयातील सर्व महसूल अधिकारी हे नायब तहसीलदार संवर्गात कार्यरत आहेत. महसूल सप्ताहात 1 ऑगस्टपासून आयोजित विविध कार्यक्रमात नायब तहसीलदार संवर्गातील अधिकारी देखील जनतेला विविध सेवा देऊन न्याय देण्यासाठी सहभाग नोंदवत आहेत.

परंतु, हे काम करत असताना विविध मागण्या प्रलंबित असल्याने नायब तहसीलदार हे स्वत:च्या संवर्गासाठी न्याय मिळवू शकत नाहीत, अशी भावना या संवर्गात आली आहे. मागण्यांबाबत 1 मार्च रोजी नोटीस देऊन 3 जुलै रोजी महाराष्ट्र राज्य तहसीलदार, नायब तहसीलदार संघटनेने बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर 5 एप्रिल रोजी महसूलमंत्री यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने व शासन स्तरावर नायब तहसीलदार संवर्गाचे 4800 ग्रेड-पे करण्याची मागणी तत्वतः मान्य झाली असल्याने सदरचे आंदोलन मागे घेण्याबाबत महाराष्ट्र राज्य तहसीलदार नायब तहसीलदार संघटनेने घोषित केले होते.

तसेच, नायब तहसीलदार सवर्गाचा वाढीव ग्रेड-पे मान्य करणे संबंधाने आवश्यक ती कार्यवाही एक महिन्यात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, याबाबत आजपर्यंत कोणतीही कार्यवाही झाली नाही. त्यामुळे नायब तहसीलदार संवर्गात काम करणार्‍या सर्वच अधिकार्‍यांवर अन्याय झाल्याची भावना जोर धरत आहे. अशा परिस्थितीत महसूल दिन साजरा करताना स्वतःच्या न्याय्य मागण्या पूर्ण करण्याबाबत नायब तहसीलदार संवर्गातील अपयशी ठरले आहेत का? असा प्रश्न निर्माण झाल्याने नैराश्याचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्यामुळे महसूल सप्ताह साजरा करताना व त्यामध्ये काम करताना नायब तहसीलदार वर्गातील अधिकारी हे काळी फीत लावून निषेध व्यक्त करत आहेत. निवेदनावर नेवासा तहसील कार्यालयाचे निवासी नायब तहसीलदार सी. बी. बोरुडे, महसूल नायब तहसीलदार डी. एम. भावले, निवडणूक नायब तहसीलदार के. आर. सानप, संजय गांधी योजना नायब तहसीलदार एस. एस. चिंतामण, डी. मु. साळवे, ए. पी. भांगे, एस. टी. उमाप, डी. आर. पांढरे, एस. पी. दातीर, एच. डी. पाचारणे, ए. एन. टिळेकर, एस. टी. गव्हाणे, एल. पी. उमाळे, पी. एन. दहिफळे, नेवासा तलाठी संघाचे अध्यक्ष बी. एन. कमानदार, उपाध्यक्ष व्ही. के. जाधव, कार्याध्यक्ष एस. के. गायकवाड यांच्या सह्या आहेत.

हेही वाचा : 

नगर : चोरीच्या दुचाकी विकणारे दोघे ताब्यात

पुणे विद्यापीठाला ऑगस्टमध्येच मिळणार प्र-कुलगुरू

 

Back to top button