नगर : पुढारी वृत्तसेवा : शहरात ढासळत असलेल्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या प्रश्नाकडे आमदार संग्राम जगताप यांनी बुधवारी (दि. 2) विधानसभेत शासनाचे लक्ष वेधले. संतांची भूमी असणार्या शहरात आज दुर्दैवाने गुन्हेगारीकरण वाढताना दिसत आहे. यामागे पोलिस दलाची निष्क्रियता कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत शासनाने त्वरित लक्ष देऊन उचित पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली. काही वर्षांपूर्वी आध्यात्मिक गुरू राजाभाऊ कोठारी महाराज यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला होता. हल्लेखोरांवर पोलिस प्रशासनाने वेळीच कठोर कारवाई केली नाही.
हेच हल्लेखोर काही दिवसांपूर्वी औरंगजेबाचे फोटो घेऊन नाचत सामाजिक सलोखा बिघडविताना दिसले. पोलिस प्रशासनाने वेळीच अटकाव केला असता तर, ही प्रवृत्ती बळावली नसती. मागील काही दिवसांत कापड बाजारात व्यापारी बांधवांवर प्राणघातक हल्ले झाले. शहरात तोफखाना पोलिस ठाण्याच्या हद्दीत खुनाच्या तीन घटना घडल्या आहेत. बुधवारी (दि.2) शहरातील एका नामवंत महाविद्यालयासमोर विद्यार्थ्यावर टोळक्याने कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. वारंवार अशा घटना घडत आहेत. पोलिस प्रशासन वेळोवेळी खबरदारी घेत असते तर ही गुन्हेगारी वाढली नसती, असेही ते म्हणाले.
याचबरोबर शहरात गुटखा तस्करी, ऑनलाईन गेमिंग, बिंगो जुगार यासारखे अवैध धंदेही फोफावत आहेत. या सर्व गोष्टींबाबत आपण पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्था राखली जावी, यासाठी शासनाने त्वरित लक्ष देऊन उचित पाऊल उचलावे, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा :