अहमदनगर : प्लॉटच्या वादातून माजी सैनिकाचा खून | पुढारी

अहमदनगर : प्लॉटच्या वादातून माजी सैनिकाचा खून

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगरमधील सेवानिवृत्त जवानाच्या खुनाच्या कटातील दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मध्य प्रदेशातील सेंधवा येथून सोमवारी (दि.31) सकाळी अटक केली. मनोज वासुमल मोतीयानी (वय 33) व स्वामी प्रकाश गोसावी (वय 28, दोघे रा. सावेडी गाव, अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत. प्लॉटच्या वादातून विठ्ठल नारायण भोर या माजी सैनिकाचा खून केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे.

बोल्हेगाव उपनगरात राहणारे विठ्ठल भोर (वय 46) घरून बेपत्ता असल्याची तक्रार तोफखाना पोलिस ठाण्यात भोर यांच्या पत्नीने दाखल केली होती. शोध सुरू असतानाच रविवारी दुपारी लोणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक बेवारस मृतदेह असल्याची माहिती मिळाली. हा मृतदेह नगर शहरातून बेपत्ता झालेल्या माजी सैनिकाचा असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. शनिवारी घरून गेलेले सेवानिवृत्त जवान भोर यांना मोतीयानी याचा फोन कॉल आला होता.

‘मी तुम्हाला दुसरा प्लॉट देतो,’ असे म्हणून मोतीयानी याने भोर यांना बोलावून घेतले होते, असे सूत्रांनी सांगितले. मोतीयानी व त्याचा साथीदार गोसावी या दोघांनी भोर यांना निंबळक येथे प्लॉट दाखविण्यासाठी नेले. तेथे त्याने भोर यांना स्क्रू-ड्रायव्हरने भोसकून ठार केले व मृतदेह लोणी परिसरातील गोगलगाव शिवारात रस्त्याच्या कडेला फेकला. नंतर आरोपींनी फोन बंद करून नगरमधून पोबारा केला.

पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, संदीप पवार, देवेंद्र शेलार, पोलिस नाईक रवींद्र कर्डिले, विजय ठोंबरे, विशाल गवांदे, फुरकान शेख, रणजित जाधव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड यांच्या पथकाने तोफखान्याचे पोलिस उपनिरीक्षक समाधान सोळंके यांच्या पथकाने मध्य प्रदेशात जाऊन आरोपींना अटक केली.

रासनेनगरातील प्लॉटचा वाद

मनोज मोतीयानी याने काही महिन्यांपूर्वी रासनेनगर परिसरातील एक प्लॉट भोर यांना लाखो रुपयांना विकला होता. मात्र, या प्लॉटबाबत न्यायालयात वाद सुरू असल्याचे त्याने लपवून ठेवले होते. त्यावरूनच दोघांमध्ये वर्षभरापासून वाद सुरू होते, असे सूत्रांनी सांगितले.

मनोज मोतीयानी सराईत गुन्हेगार

आरोपी मनोज वासुमल मोतीयानी हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर 2011 पासूनचे तोफखाना पोलिस ठाण्यात विनयभंग, अल्पवयीन मुलीस पळवून नेणे, दुखापत करणे, खंडणीच्या उद्देशाने जिवे मारण्याची धमकी देणे असे पाच गुन्हे दाखल आहेत. तर कोतवाली पोलिस ठाण्यात मारहाण करून जखमी केल्याचा एक गुन्हा दाखल आहे. तसेच, मोतीयानी हा न्यायालयाने बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंटमधील आरोपी असल्याचेही पोलिस सूत्रांनी सांगितले.

असा लागला गुन्ह्याचा छडा

स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळावरील आरोपींच्या वाहनाच्या टायरचे ठसे व सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला. सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळलेल्या कारचा शोध सुरू केल्यानंतर मोतीयानी व त्याचा साथीदार नगरमधून निघून गेले होते. त्यानंतर नाशिक येथे मोतीयानीच्या नातेवाइकांकडे चौकशी केली असता तो भोपाळकडे गेल्याचे समजले. या माहितीच्या आधारे एलसीबी व तोफखाना पोलिसांनी आरोपींना मध्य प्रदेशातील सेंधवा येथून अटक केली.

हेही वाचा

ऑगस्ट महिना घेऊन आलाय पाच आर्थिक बदल

अहमदनगर जिल्हा रुग्णालय : निविदेत एक, खरेदी दुसरीच!

अहमदनगर : आता महापालिका आयुक्तांचे बनावट व्हॉटस्अ‍ॅप अकाउंट

Back to top button