अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 66 टक्के पाणीसाठा

अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 66 टक्के पाणीसाठा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने भंडारदरा, निळवंडे, मुळा आणि आढळा या धरणांत पाण्याची नवीन आवक झाली. त्यामुळे भंडारदरा धरण 85 टक्के भरले आहे. आजमितीस या धरणात 9 हजार 225 दलघफू इतका पाणीसाठा झाला आहे. 15 ऑगस्टपूर्वीच हे धरण ओव्हरफ्लो होते. येत्या दोन- चार दिवसांत हे धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता बळावली आहे. मुळा धरण 64 टक्के भरले असून या धरणात 16 हजार 649 दलघफू इतका पाणीसाठा आहे. निळवंडे धरण देखील 74 टक्के भरले आहे. दरम्यान, कृष्णा खोर्‍यातील सीना, खैरी, मांडओहळ या मध्यम धरणांची पाणीपातळी अद्याप 30 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

सलग चार वर्षे जिल्हाभरात सरासरीपेक्षा जादा पावसाची नोंद झाली. त्यामुळे सर्वच धरणे देखील ओव्हरफ्लो झाली होती. नाशिक आणि नगर जिल्ह्यात अधिक पाऊस झाला. त्यामुळे औरंगाबादचे जायकवाडी धरण देखील काठोकाठ भरले होते. त्यामुळे जिल्ह्यांतील धरणांचे पाणी जायकवाडी धरणाला सोडण्याची वेळ आली नव्हती. परंतु जून महिन्यात दोन्ही नक्षत्रे कोरडीठाक गेले. त्यामुळे यंदा धरणेभरतील की नाही अशी शंका होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पाणलोट क्षेत्रात दमदार पावसाने हजेरी लावली.

त्यामुळे धरणांत पाण्याची आवक वाढली आहे. 30 जुलै रोजी सकाळी 7 वाजता भंडारदा धरणात 9 हजार 225 दलघफू इतका पाणीसाठा नोंद झाला आहे. या धरणात 10 हजार दलघफू इतका पाणीसाठा झाला की धरण ओव्हरफ्लो झाल्याचे जाहीर केले जाते. येत्या दोन चार दिवसांत भंडारदा धरण भरण्याची शक्यता आहे. गेल्या महिन्यात निळवंडे धरणातून आवर्तन सोडण्यात आले होते.या धरणात नव्या पाण्याची आवक होऊन ते 6 हजार118 दलघफूवर पोहोचले आहे. हे धरण जवळपास 74 टक्के भरले आहे.

अहमदनगर शहर, नगर एमआयडीसी, राहुरी, सोनई व इतर काही पाणीयोजना तसेच राहुरी, नेवासा, पाथर्डी या तालुक्यांतील शेतीला पाणीपुरवठा करणारे मुळा धरणही 64 टक्के भरले. हे धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी आणखी आठ टीएमसी पाण्याची आवक हवी आहे. अकोले तालुक्यातील आढळा धरणात पाण्याची आवक वाढली आहे. त्यामुळे हे धरण देखील 67 टक्के भरले आहे. सीना, खैरी, मांडओहळ व इतर छोटे प्रकल्प हे कृष्णा खोर्‍यात असून, ते अद्याप 50 टक्के भरले नाही. पुणे जिल्ह्यातील घोड धरणाचे पाणी श्रीगोंदा, पारनेरसह इतर तालुक्यांसाठी वरदान आहे. आजमितीस हे धरण 25 टक्के भरले आहे. पाणीसाठा (दलघफू)
भंडारदरा 9225, मुळा 16649, निळवंडे 6118, आढळा 705, मांडओहळ 40.60, घाटशिळ 46, सीना 689.57, खैरी 88.10, विसापूर 85.87.

14 हजार 594 दलघफू पाण्याची आवक

8 जुलैला भंडारदरा धरणात 6 हजार 350 तर निळवंडे धरणात 1 हजार 874 दलघफू असा दोन्ही धरणांत एकूण 8 हजार 224 दलघफू इतका पाणीसाठा होता. त्यानंतर गेल्या काही दिवसांपासून या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरु आहे. त्यामुळे भंडारदरात 9 हजार 225 तर निळवंडे धरणात 6 हजार 118 असा दोन्ही धरणांत एकूण 12 हजार 343 दलघफू इतका पाणीसाठा झाला. मुळा धरणात 9 हजार 276 दलघफू पाणीसाठा होता. आ मात्र तो पाणीसाठा 16 हजार 649 दलघफू इतका झाला आहे. गेल्या 21 दिवसांत सरासरी 14 हजार 594 दलघफू पाणीसाठ्याची आवक झाली आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news