पाथर्डी : पॉलिशच्या बहाण्याने दागिने लांबविण्याचा प्रयत्न

file photo
file photo

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : सोन्याच्या दागिन्यांना पॉलिश करून दाखवितो, असे सांगत एका महिलेच्या अंगावरील सोन्याचे दागिने पसार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या एका ठगाला पकडण्यात आले. तर, दुसरा तेथून पसार झाला. पाथर्डी शहरातील संत वामनभाऊनगर येथे ही घटना घडली. गोविद शिवण साह (वय 38, रा. मक्खातकिया, नोगाछिया, भागलपूर, बिहार) असे पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. संत वामनभाऊनगर येथील नामदेव बाजीराव खेडकर यांच्या घरासमोर शुक्रवारी (दि.28) रोजी सकाळी 10 च्या सुमारास दोन अनोळखी इसम आले. आम्ही मुंबई येथील कंपनीच्या पावडरची मार्केटिंग करण्यासाठी आलो आहोत.

आमच्याकडे सोन्याची पॉलिश करण्यासाठी लागणारी पावडर आहे. तिची सँपल आम्ही तुम्हाला देतो व सोन्याचे दागिने पॉलिश करून दाखवतो, असे ते बाजीराव व त्यांच्या पत्नी कुसुम खेडकर यांना म्हणाले. कुसून खेडकर यांनी अंगावरचे सोन्याचे दागिने पॉलीश करण्यासाठी दिले असता, आरोपींनी पावडरमध्ये ते पॉलिश केले. त्यानंतर आरोपींनी ते त्यांच्याकडे पावडर असलेल्या प्लास्टिकच्या पिशवीत टाकले. दागिने पॉलिश केल्यानंतर 20 मिनिटे पिशवीत टाकून पावडरमध्ये ठेवावे लागतात, असे तो म्हणाला. खेडकर यांची नजर चुकवून दागिने असलेल्या पिशवी सारखीच दिसणारी दुसरी पिशवी खेडकर यांची दागिन्यांची पिशवी आहे, असे भासवून त्यांच्याकडे देऊ लागला.

हा प्रकार बाजीराव खेडकर यांच्या लक्षात आल्याने त्यांनी आमच्या दागिन्यांची पिशवी देण्याची मागणी केली. त्यानंतर दोघांपैकी एक जण पळाला. दागिने पॉलिश करून दाखविणारा दुसरा इसमही पळून जाऊ लागला. खेडकर यांनी त्याला पकडले व आरडाओरडा केल्याने आजूबाजूचे लोक जमा झाले. त्याच्याकडे असलेली काळ्या रंगाची पिशवी तपासली असता त्यामध्ये खेडकर यांचे दागिने आढहून आले. गोविंद साह या ठगाला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून, पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news