

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्हास्तरीय समितीच्या आदेशानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील दुध संकलनाचा अधिकृत परवाना नसलेल्या जय हनुमान दूध संकलन केंद्रावर अचानक धाड टाकून कारवाई केली आहे. गुणवत्ता तसेच भेसळ याचा संशय आल्याने या केंद्रातील 2 हजार 200 लिटर दुध पंचनामा करुन नष्ट करण्यात आले.
दुधातील भेसळीला पायबंद घालण्यासाठी अपर जिल्हाधिकारी सुहास मापारी यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय समितीची बैठक नुकतीच झाली. या बैठकीत दुध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणार्या व्यक्तींवर थेट गुन्हे दाखल करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
त्यानुसार अन्न व औषध प्रशासन विभागाने 25 जुलै रोजी पारनेर तालुक्यातील पाडळी रांजणगाव येथील जय हनुमान दूध संकलन केंद्रावर धाड टाकली. या केंद्राकडे दुध संकलनाचा अधिकृत परवाना आढळून आला नाही. तसेच या ठिकाणी दुधाच्या नमुन्याची कोणतीही तपासणी केली जात नसल्याचे आढळून आले आहे. या कारवाईत नाशिक विभागाचे सहआयुक्त नरगुडे, सहायक आयुक्त भूषण मोरे अन्न व सुरक्षा अधिकारी श्रीमती पाटील सहभागी झाले होते. तसेच या पथकाने श्रीगोंदा तालुक्यातील कोळगाव येथील 2, व बनपिंप्री येथील एका अशा तीन दूध संकलन केंद्रातील 4 नमुने तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत.
हेही वाचा