शिवाजी विद्यापीठ ‘रिसर्च अ‍ॅनालिसिस’मध्ये अग्रेसर | पुढारी

शिवाजी विद्यापीठ ‘रिसर्च अ‍ॅनालिसिस’मध्ये अग्रेसर

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : अल्प कालावधीत गतिमान व दर्जेदार संशोधकीय नमुना विश्लेषण (रिसर्च अ‍ॅनालिसिस) करून देण्यामध्ये शिवाजी विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रातील एक्सआरडी, टीजीए-डीटीए-डीएससी, एफटीआयआर या अत्याधुनिक उपकरणांना देशभरातील संशोधकांची पसंती लाभत आहे. भारत सरकारतर्फे विकसित पंतप्रधानांच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागारांच्या ‘इंडियन सायन्स, टेक्नॉलॉजी अँड इंजिनिअरिंग फॅसिलिटीज मॅप’ (आय-स्टेम) पोर्टलवर सर्वाधिक नोंदणी झाली आहे. ‘आय-स्टेम’च्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याची माहिती दिली आहे.

पंतप्रधानांचे वैज्ञानिक सल्लागार यांच्यासह विविध वैज्ञानिक विभागामार्फत देशातील विविध संस्थांना अत्याधुनिक शास्त्रीय उपकरणे देण्यात येतात. उपकरणांवरील पृथक्करणासाठी ‘आय-स्टेम’चे (बंगळूर) पोर्टल निरीक्षण व नोंदणी सुविधा प्रदान करते. पोर्टलवर देशभरातील 2277 संस्थांची 25 हजार 881 शास्त्रीय उपकरणे नोंद असून महाराष्ट्र चौथ्या क्रमांकावर आहे. भारतात संशोधकीय नमुना विश्लेषणासाठी आठ उपकरणे सर्वाधिक वापरली जातात.

विद्यापीठातील मध्यवर्ती सुविधा केंद्रातील (सीएफसी) सोफिस्टिकेटेड अ‍ॅनालिटिकल इन्स्ट्रूमेंट फॅसिलिटी (सैफ-डीएसटी) केंद्रातील एक्स रे पॉवर डिफ्रॅक्शन (एक्सआरडी), फोरियर ट्रान्स्फॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोमीटर (एफटीआयआर), थर्मोग्रॅव्हिमेट्रिक अ‍ॅनालायझर- डिफ्रन्शियल थर्मल अ‍ॅनालिसिस -डिफ्रन्शियल स्कॅनिंग कॅलोरीमीटर (टीजीए-डीटीए-डीएससी) या तीन उपकरणांची सर्वाधिक मागणी असणारी व सेवा प्रदान करणारी उपकरणे म्हणून नोंद झाली आहे. सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामध्ये उपलब्ध अद्ययावत उपकरणे, त्यांची सुस्थिती तत्परता व पारदर्शकता यामुळेच विद्यापीठाला पसंती मिळत असल्याचे प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांनी सांगितले.

1251 नमुन्यांची विश्लेषणासाठी नोंदणी

विद्यापीठाच्या मध्यवर्ती सुविधा केंद्रात 14 आधुनिक शास्त्रीय विश्लेषक उपकरणे आहेत. ‘आय-स्टेम’कडून प्रत्येक उपकरणास कोड दिले आहेत. सैफ-डीएसटीकडील एक्सआरडी, एफटीआयआर, टीजीए-डीटीए-डीएससी उपकरणांसाठी कमी वेळेमध्ये सर्वाधिक बुकिंग नोंद झाले आहेत. नमुन्यांचे पृथक्करण कमी वेळेत करून देण्यात येते. आतापर्यंत 1251 नमुन्यांची विश्लेषणासाठी नोंद झाली आहे. सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रातील 14 उपकरणांद्वारे केलेल्या विश्लेषणातून 2021-22 व 2022-23 या आर्थिक वर्षांमध्ये 10 लाख33 हजार 700 रुपये आणि 23 लाख 28 हजार 469 असे मिळून 33 लाख 62 हजार 169 रुपयांचे शुल्क प्राप्त झाल्याची माहिती सैफ-डीएसटीचे प्रमुख डॉ. राजेंद्र सोनकवडे यांनी दिली.

तीन उपकरणांमधून असे होते विश्लेषण

सैफ-सीएफसी-डीएसटी केंद्रामधील तीन उपकरणांस विश्लेषणासाठी सर्वाधिक मागणी आहे. एक्सआरडी उपकरणाद्वारे संशोधकांनी बनवलेल्या रासायनिक पदार्थांमधील अणूंची रचना, त्यांचा आकार, प्रकार हे गुणधर्म अभ्यासले जातात. एफटीआयआर उपकरण पदार्थांच्या रासायनिक गुणधर्मातील घटक कोणता आहे हे शोधून काढण्यासाठी उपयुक्त आहे. टीजीए-डीटीए-डीएससी उपकरण पदार्थावर कमी अधिक प्रमाणात होणारा उष्णतेचा परिणाम, तत्सम गुणधर्मांच्या अनुषंगाने माहिती विश्लेषण करण्यासाठी उपयुक्त ठरते.

Back to top button