धक्कादायक : ऑटोमोबाईल्स कंपनीमधून सिव्हिलची मेडिसीन खरेदी! | पुढारी

धक्कादायक : ऑटोमोबाईल्स कंपनीमधून सिव्हिलची मेडिसीन खरेदी!

गोरक्ष शेजूळ

अहमदनगर : जिल्हा रुग्णालयातील 27 कोटींची कोरोना औषध खरेदी चर्चेत आहे. तसेच, शस्त्रक्रियागृह उभारणीत झालेल्या आर्थिक गैरव्यवहारांचा ठपका चौकशी अहवालातून ठेवण्यात आला आहे. अशातच आता रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट कीटची खरेदीही संशयात सापडली आहे. सिव्हिल प्रशासनाने चक्क वसईच्या एका चारचाकी गाड्यांचे सामान विकणार्‍या कंपनीकडून दोन लाख कीट विकत घेतल्याचे दाखविले असून, त्यापोटी ‘प्रभंजन ऑटोमाबाईल्स प्रा. लि. कंपनीला दोन कोटी रूपये दिल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. दरम्यान, औषध निर्मिती करणारी कंपनी किंवा शासनाने नेमलेली एखादी मेडिकल संस्था नव्हे, तर चक्क ऑटोमोबाईल्समधून केलेली ही खरेदी नेमक्या कोणाच्या शिफारशीने झाली, याची चौकशी होण्याची मागणी होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील औषध खरेदीसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. पोखरणा आदींचाही या समितीत समावेश होता. सुमारे 27 कोटींची औषध व अन्य साहित्य साम्रगी या समितीने खरेदी केली होती. मात्र, ही खरेदी नगरच्याच दोन औषध विक्रेत्यांकडून कशी करण्यात आली, त्यांनाच पुरवठ्याचा ठेका कोणाच्या आशीर्वादाने मिळाला, याविषयी वेगवेगळ्या चर्चा असताना, यातील पाच कोटींची बिलेच प्रशासनाला सापडत नव्हती. याबाबत दै. पुढारीने लक्ष वेधल्यानंतर ‘ती’ बिले अखेर सापडल्याचे प्रशासनाकडून समजले.

मेडिकल कंपनी नव्हे, डायरेक्ट ऑटोमोबाईल्सवाला!

शासनाने कोरोनातील औषध खरेदी ही हाफकीनच्या माध्यमातूनच करावी, अशा सूचना केल्या होत्या. सिव्हिलने तशा पद्धतीने प्रयत्न केला. मात्र, दर अधिक होते, शिवाय पुरवठा शक्य नसल्याने ती खरेदी दुसर्‍या औषध निर्मिती कंपन्याकडून केल्याचे सांगितले जाते. मात्र, त्यात ऑटोमोबाईल्स कंपन्याही रॅपिड टेस्ट कीटसारखे मेडिकलशी संलग्न उपकरणांची विक्री करत होत्या, हे काही बिलांवरून पुढे आले आहे. खरोखरच या कंपन्यांना तशी परवानगी होती की या कंपनीच्या नावे निघालेली बिलेच चुकीची आहेत, याविषयी चौकशीतून सत्य पुढे यावे, अशी जनतेची मागणी आहे.

‘मेरीस्क्रिन’ खरेदीचीही चौकशी होणार का?

आनंद केमिस्टस्मधूनही 1 लाख रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट कीट सिव्हिलने खरेदी केल्या आहेत. जीएसटी वगळता 103 रूपयाने ही खरेदी आहे. त्यापोटी 1 कोटी 15 लाख 36 हजार रूपये अदा केलेले आहेत. शिवाय हे बिल 31 जुलै 2021 रोजीचे आहे. त्यानंतर मेरीस्क्रिन कोविड 19 एजी 25 टी या 4 हजार कीट जीएसटीसह अन्य कर वगळता 2575 रूपये कीट प्रमाणे खरेदी केले आहेत. याची मार्केटमध्ये आज किंमत पाहिली तर यातही धक्का बसणार आहे.

सिव्हिलने ‘या’ कंपनीकडून केली खरेदी

वसईच्या प्रभंजन ऑटोमोबाईल्स प्रा. लि. या कंपनीकडून रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट कीट 86.40 दराने 1 लाख कीट खरेदी केल्या होत्या. त्यापोटी 90 लाख 72 हजार रूपये पेमेंट या कंपनीला देण्यात आले होते. त्यानंतर याच कंपनीकडून पुन्हा 1 लाख कीट सिव्हिलने खरेदी केल्या. यावेळी मात्र 103 रूपये दराने ही खरेदी झाली. त्यापोटी 1 कोटी 15 लाख 36 हजार रुपये याच अ‍ॅटोमोबाईल्स कंपनीला अदा करण्यात आले. यातील एक बील 23 जुलैे, तर दुसरे बिल 31 जुलै रोजी अदा केले आहे. असे एकूण 2 कोटी 6 लाख 8 हजार रुपये या ऑटोमोबाईल्स प्रा. लि. या कंपनीला सिव्हिल प्रशासनाने अदा केले आहेत.

रॅपिड अ‍ॅन्टीजन टेस्ट किटची आपण दाखविलेली खरेदीची बिले मी पाहिली आहेत. या संदर्भात उद्याच चौकशी करून त्या विक्रेत्याकडून खुलासा मागवू. तशी संबंधित ऑटोमोबाईल्स कंपनीला नोटीस पाठविली जाईल.

– डॉ. संजय घोगरे,
जिल्हा शल्यचिकित्सक, सिव्हिल

हेही वाचा

गांधीजींचा अवमान; संभाजी भिडेंवर कारवाई होणारच : देवेंद्र फडणवीस

कोकण, घाटमाथ्यावर गुरुवारपर्यंत पाऊस

मेथी, कोथिंबीर, शेपू चे भाव गडगडले

Back to top button