संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : संगमनेर शहरात कुठल्याही प्रकारची परवानगी न घेता बेकायदेशीरित्या अनेक कॅफे हाऊस चालू आहेत. मात्र ही कॅफे हाऊस चहा कॉफी पिण्याचे ठिकाण न बनता मुला मुलींना अश्लील चाळे करण्याचे ठिकाण बनले आहे. पठार भागातील एका मुलीवर बेकायदेशीर चालणार्या कॅफे हाऊसमध्ये अत्याचार झाल्याची घटना उघड झाली आहे. त्यामुळे पैशाच्या लालसेपोटी मुलींना वाम मार्गाला लावणार्या कॅफे हाऊसचा पोलिसांनी पर्दाफाश करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
संगमनेर शहरातील वेगवेगळ्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात कुठल्याही प्रकारची परवानगी अगर नोंद न करता कॅफे सेंटर गेल्या काही वर्षापासून सुरू आहे. या कॅफे चालकांनी त्या कॅफे हाऊसमध्ये मुला मुलींना एकांतात बसण्यासाठी स्वतंत्र कप्पे (कम्पार्ट मेंट) व खोल्याही निर्माण केल्या आहेत. अशा ठिकाणी एखादे जोडपे आल्यास त्यांच्याकडून तासानुसार पैसे वसुल केले जातात. त्या बदल्यामध्ये संबंधित जोडप्याला एकांतही उपलब्ध करुन दिला जातो.
त्याचा परिणाम अनेक पिसाट अल्पवयीन मुलींसह विद्यार्थीनींना कॉफीचे आमिष दाखवून अशा कॅफे हाऊसमध्ये घेवून येतात आणि मिळालेल्या एकातांत मुलीशी अश्लिल कृत्य करतात. मध्यंतरी शहर पोलिसांच्या पथकाने शहरात चालणार्या या बेकायदेशीर कॅफे हाऊसवर छापे मारले होते. त्यावेळी या कॅफे हाऊसमध्ये अनेक प्रतिष्ठितांची मुले मुली आढळून आले. मात्र पोलिसांनी कॅफे हाऊसमध्ये सापडलेल्या मुला मुलींच्या पुढील भवितव्याचा विचार केला. त्यावेळी त्यांच्या पालकांना बोलावून समज देत विषय संपवून टाकला, मात्र त्याचवेळी त्या कॅफे चालकांवरती गुन्हे दाखल करत कॅफे हाऊस बंद केले असते तर यास वेळीच चाप बसला असता.
अकोले बायपास रोडवरील एंजल कॅफे हाऊसमध्ये एका शाळकरी अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाला. यात कायदेशीरदृष्ट्या अशा गुन्ह्यात सहाय्य करणारा सुद्धा तितकाच दोषी असतो. म्हणूनच पोलिसांनी एंजल कॅफेच्या चालक मालकावर कारवाई केली आहे. यापुढे उपविभागातील कोणते ही कॅफे हाऊस अथवा लॉजमध्ये असे गैरप्रकारांना खतपाणी घालणार्या संबंधितांना त्या प्रकरणात सहआरोपी केले जाईल असे सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले.
हेही वाचा