नेवासा: ओल्या दुष्काळाचे अनुदान खात्यावर जमा करा | पुढारी

नेवासा: ओल्या दुष्काळाचे अनुदान खात्यावर जमा करा

नेवासा(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नेवासा बुद्रूक मंडळासह वंचित राहिलेल्या मंडळातील शेतकर्‍यांना ओल्या दुष्काळाचे अनुदान तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करण्याबाबत तहसीलदार संजय बिरादारांना निवेदन देण्यात आले. तातडीने अनुदान जमा न झाल्यास 4 ऑगस्टपासून तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनात म्हटले, मागील वर्षी 2022-23 मध्ये नेवासा तालुक्यात सतत मोठ्या प्रमाणात पाऊस पडला. त्यामुळे शेतकर्‍यांचे उभे पीक पावसामुळे जमीनदोस्त झाले. त्यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. शेतकरी बांधवांनी सोसायटी, बँकाचे कर्ज व इतर नातेवाईकांकडून घेतलेले उसने पैसे फेडता आले नाही. तरी शासनाचे ओल्या दुष्काळाचे अनुदान नेवासा बुद्रूक व इतर महसूल मंडळातील गावांचे पैसे शासनाच्या नियमानुसार लवकर शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करणे गरजेचे आहे.

यावर्षी पाऊसाने दडी मारल्याने शेतकर्‍याने पेरणी करूनही पिके पाऊसाच्या पाण्यावाचून जळू लागले आहे. तसेच, तालुक्यात दुबार पेरणीचे संकट उभे राहिले आहे. असे असताना शासनाने शेतकर्‍यांच्या मानसिक व भावनिकतेचा विचार करून दुष्काळ सदृश्य परिस्थितीमध्ये शेतकर्‍यांसाठी काडीचा आधार म्हणून असलेले ओल्या व सततच्या पाऊसाचे शासकीय अनुदान आठ दिवसांत शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करावे.

अन्यथा आम्ही तालुक्यातील शेतकरी शुक्रवारी (दि.4) ऑगस्टापासून तहसील कार्यालयासमोर उपोषण सुरू करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर अनिल ताके, जानकीराम डौले, रवींद्र मारकळी, संजय जायगुडे, डॉ. महेश हापसे, विलास चव्हाण, दीपक जायगुडे, गणेश पवार, जे. एम. वाकचौरे, मंज्याबापू चव्हाण, प्रमोद मारकळी, अमोल पिंपळे आदींच्या सह्या आहेत.

‘अनुदानाची रक्कम का रोखली’

तालुक्यातील एकूण आठ मंडळांपैकी केवळ तीन मंडळातील अतिवृष्टी झालेल्या शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम मिळालेली असून, ही रक्कम देताना शासनाने उर्वरित पाच मंडळांना अनुदानाची रक्कम देण्यापासून का रोखले, असा सवाल युवा नेते अनिल ताके यांनी केला.

‘वेळप्रसंगी आंदोलनचा इशारा’

आठ दिवसांत नेवासा बुद्रूकसह इतर गावातील शेतकर्‍यांना अनुदानाची रक्कम न मिळाल्यास नुकसान ग्रस्त शेतकरी कुटुंबियांसह नेवासा तहसील कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार असून, वेळप्रसंगी आंदोलन आधिक तीव्र करण्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब कोकणे यांनी दिला.

हेही वाचा

Parliament Monsoon Session: मणिपूर हिंसाचारावरून संसदेत पुन्हा गदारोळ; राज्यसभा दिवसभरासाठी तहकूब

शेवगाव : ताजनापूरच्या पाण्यासाठी उभारणार लढा

नेवासा : काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर!

Back to top button