अहमदनगर : ओढ्यांवरील पाईप तसेच; ‘स्थायी’चे आश्वासन पाण्यात!

अहमदनगर : ओढ्यांवरील पाईप तसेच; ‘स्थायी’चे आश्वासन पाण्यात!
Published on
Updated on

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : नगर शहर व उपनगरांमध्ये सुमारे 45 ओढे-नाले आहेत. त्यातील अनेक ओढ्यांवर पाईप टाकून लेआऊट मंजूर केले असून, अनेक ठिकाणी ओढ्यावर पाईप टाकून पक्के रस्तेही करण्यात आले आहेत. नाशिक येथील संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात या सर्व बाबी स्पष्ट झाल्यानंतर महापालिकेच्या नगररचना विभागाने एका ओढ्यावरील पाईप काढून टाकले. इतर ठिकाणचे पाईप काढण्याचे आश्वासन नगररचनाकार राम चारठाणकर यांनी स्थायी समितीच्या सभेत दिले होते. त्याला पंधरा दिवस उलटूनही अद्याप पाईप काढण्याची कारवाई झाली नाही. अधिकार्‍यांचे ते आश्वासन सध्या पाण्यात गेल्याची चर्चा महापालिकेत आहे.

सामाजिक कार्यकर्ते शशिकांत चेंगेडे यांनी शहरातील ओढे-नाले पाईप टाकून बुजविल्याबाबत महापालिका आयुक्त, जिल्हाधिकार्‍यांसह थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती. कारण पावसाळ्यात ओढे-नाले तुंबून अनेक नागरिकांच्या घरात पाणी घुसले होतेे. त्यात अनेकांच्या संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले होते. जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली असलेल्या आपत्ती व्यवस्थापन समितीनेही महापालिकेला पाईप काढून ओढे मोकळे करण्याचा आदेश दिला होता.

दरम्यान, महापालिकेने शहरातील ओढ्या-नाल्यांची मोजणी करण्यासाठी नाशिक येथील एका संस्थेची नेमणूक केली होती. त्या संस्थेने संपूर्ण शहरातील ओढ्या-नाल्यांची मोजणी करून अहवाल आयुक्तांना दिला. त्यात सुमारे 45 ओढे-नाले आढळून आले. त्यातील अनेक ओढ्यांमध्ये अतिक्रमण झाल्याचे निष्पन्न झाले, तर अनेक ओढ्यांमध्ये पाईप टाकून ओढेच भूमिगत केल्याचेही समोर आले आहे. सावेडी उपनगरामध्ये ओढ्यांची दिशाच बदलली आहे. आयुक्तांनी संबंधित विभागाच्या अधिकार्‍यांना उन्हाळ्यात ओढ्यावरील पाईप काढण्याचे आदेश दिले होते.

पंधरा दिवसांपूर्वी स्थायी समितीच्या सभेतही विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी ओढ्यांवरील पाईप कधी काढणार, असा सवाल केला होता. त्यावर चार दिवसांत पाईप काढून घेण्यात येतील, असे नगररचनाकार राम चारठाणकर यांनी सांगितले होते. त्याला आता पंधरा दिवस झाले, तरी कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही.

दरम्यान, अनेक ओढ्यांमध्ये अतिक्रमण करून लेआऊट मंजूर केल्याचे आरोप नगरसेवकांनी स्थायी समितीमध्ये केले आहेत. तरीही अद्याप ओढ्या-नाल्यांवरील पाईप काढलेले नाहीत. आता तर पावसाळा सुरू झाला असून, मोठा पाऊस झाल्यानंतर नागरिकांच्या घरात पाणी घुसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

स्थायी समितीत ओढ्यांवरील पाईप काढणार असल्याचे सांगितले होते. मात्र, अद्याप कोणतीच कारवाई झालेली नाही. महापालिकेच्या अधिकार्‍यांनी ओढ्यावर लेआऊट करून नगर शहराची वाट लावली आहे. त्यात आयुक्तांनी लक्ष घालणे गरजेचे आहे. ओढ्यावरील पाईप न काढल्यास स्थायी समिती व महासभा होऊ देणार नाही.

– संपत बारस्कर, विरोधी पक्षनेता

ओढ्यांवरील पाईप काढण्यासाठी सर्वपक्षीयांनी एकत्र येऊन निर्णय घेणे आवश्यक आहे. केवळ मूठभर लोकांची मर्जी राखण्यासाठी लाखो नागरिकांना वेठीस धरणे चुकीचे आहे. महापालिका अधिकारी तारीख पे तारीख करीत आहेत. ओढ्यांवरील पाईप न काढल्यास महापालिकेत कोणतीच सभा होऊ देणार नाही.

– निखील वारे, माजी नगरसेवक

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news