हिंगोलीत अतिवृष्टी सदृश्य पाऊस; गुरूव्दारा परिसरातील तलावाचा बांध फुटला

हिंगोली ; पुढारी वृत्तसेवा शहरात झालेल्या अतिवृष्टीमुळे गुरुद्वारा परिसरातील तलावाचा बांध फुटला. यामुळे अनेक घरात पाणी शिरले आहे. दरम्यान वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ यांनी शहरात प्रत्यक्ष भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी प्रशासनास आवश्यक सूचना केल्या तसेच तलावातील पाणी पातळी वाढण्याची शक्यता असून, तलाव परिसरातील नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले. तसेच प्रशासनाच्या विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून आवश्यक त्या सूचना दिल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या मार्गदर्शनात प्रशासन सज्ज असल्याचेही ते म्हणाले. तहसीलदार श्रीमती दळवी, मुख्याधिकारी आशीतोष चिंचाळकर, गट विस्तार अधिकारी तानाजी कदम, पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आदींची यावेळी उपस्थिती होती.
शहरातील मदिना चौक, आंबेडकर नगर, कारखाना रोड, सम्राट कॉलनी, छोटा तालाब, वीटभट्टी परिसर आदी ठिकाणी अनेकांच्या घरात पाणी शिरले. यात जीवनावश्यक उपयोगी वस्तू, सामानाचे मोठे नुकसानाचे झाले आहे.
दरम्यान माजी नगराध्यक्ष शिवदास बोड्डेवार, अब्दुल हफिज, खलील अहेमद, माजी नगरसेवक हाजी खैसर अहेमद, शेख हबीब, ऐड शेख मोहसीन, रविकिरण वाघमारे आदींनी शहरात भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.