सर्पदंश, अपेंडिक्सवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार | पुढारी

सर्पदंश, अपेंडिक्सवर महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार

मुंबई; पुढारी वृत्तसेवा :  सर्पदंश आणि अपेंडिक्स या आजारांचा आता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत समावेश करण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दीपक चव्हाण यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या अंतर्गत आजारांची संख्या वाढविण्याबरोबरच या योजनेचा गरिबांना लाभ मिळत नसून या योजनेत समावेश असलेल्या आजारांबाबत संभ्रम असल्याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती. त्याला उत्तर देताना मंत्री सावंत म्हणाले, राज्य शासनाने महात्मा फुले जन आरोग्य योजना सार्वत्रिक केली आहे. त्याअंतर्गत महाराष्ट्रात 5 लाखांपर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. या योजनेअंतर्गत सध्या 996 आजारांचा समावेश असून त्याची संख्या 1 हजार 356 केली जाणार आहे. तसेच या योजनेत समावेश करावयाच्या आजारांच्या निवडीसाठी एक विशेष समिती स्थापन करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

सर्पदंशावरील औषधांचा काळाबाजार

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी पेणमधील सारा ठाकूर (वय 12) या मुलीचा सर्पदंशामुळे मृत्यु झाल्याच्या दुर्देवी घटनेकडे स्थगन प्रस्तावाद्वारे सभागृहाचे लक्ष वेधले. सर्पदंशावरील औषध उपजिल्हा रुग्णालयात सक्तीचे असतानाही, पेण रुग्णालयातील डॉक्टरांनी तातडीने हे इंजेक्शन उपलब्ध करुन या मुलीचा जीव वाचविणे आवश्यक होते, पण तसे न करता त्यांनी उपचारास नकार दिला ही अक्षम्य चूक आहे, असा आरोप त्यांनी केला. तिचा मृत्यू सर्पदंशामुळे नाही तर सरकारी अनास्थेमुळे झाला, असे त्यांनी सांगितले.

सर्पदंशावरील उपचारांसाठी एखाद्याला खासगी रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये दाखल केल्यावर औषधाचा व आयसीयूचा खर्च शासकीीय योजनेत गृहित धरला जात नाही. व्हेंटीलेटरवर ठेवल्याचे सिध्द झाले तरच त्या खर्चाचा समावेश महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेत होतो. त्यामुळे या योजनेत आयसीयूचा खर्च देण्याची तरतूद करण्याची गरज भास्कर जाधव (ठाकरे गट) यांनी व्यक्त केली. त्यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी ही माहिती अत्यंत गंभीर असल्याचे मत व्यक्त करीत संर्प दंशावरील सर्व खर्च या आरोग्यदायी योजनेतून करण्याचे आदेश दिले.

   

   हेही वाचा : 

  • Red alert in Mumbai : मुंबईला पावसाचा पुन्हा रेड अलर्ट
  • SSC Supplementary Exam : अतिवृष्टीमुळे दहावीच्या पुरवणी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल
  • कोल्हापूर : तेवीस दिवसात भरले राधानगरी धरण

Back to top button