पाथर्डी : तहसीलच्या दुसर्‍या मजल्यावर प्रांत कार्यालय | पुढारी

पाथर्डी : तहसीलच्या दुसर्‍या मजल्यावर प्रांत कार्यालय

पाथर्डी तालुका(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी व शेवगावचे उपविभागीय कार्यालयाची इमारत पाथर्डी तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीवर उभारण्यात येणार आहे. या कामास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या बांधकामासाठी दहा कोटी रुपये राज्य सरकारकडून मंजूर झाले आहेत. पाथर्डी व शेवगाव उपविभागीय कार्यालय हे पाथर्डी तालुक्यातील माळी बाभूळगाव येथे जिल्हा परिषदेच्या शासकीय विश्रामगृहाच्या जागेत सध्या कार्यरत आहे.

सन 2014 मध्ये पाथर्डीला उपविभागीय कार्यालय मंजूर करून ते सुरू करण्यात आले होते.अशा छोट्याशा जागेतून पाथर्डी आणि शेवगाव तालुक्यांच्या तहसील कार्यालयांतील वरिष्ठ पातळीवरचे कामकाज उपविभागीय कार्यालयातून होत असताना जागेची कमतरता मोठ्या प्रमाणात भासत होती. दोन्ही तालुक्यांचे महसूलचे रेकॉर्ड तहसील कार्यालयानंतर अतिरिक्त वरिष्ठ पातळीवरचे कामकाज उपविभागीय कार्यालयात होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कागदपत्रांचा दस्तावेज गोळा होतो.

या सर्व कागदपत्रांची जपवणूक करण्यासाठी कार्यालयात मोठ्या प्रमाणात जागा असणं गरजेचे असते. मात्र, पाथर्डी उपविभागीय कार्यालयाला म्हणावी तशी जागा नऊ वर्षांपासून उपलब्ध नव्हती. आता जागा उपलब्ध होऊन इमारतीचा प्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे कार्यालयातील असलेले कागदपत्रांचे दस्तावेज हाताने सोयीस्कर हाताळण्यासाठी त्याची मदत होऊन कार्यालयातील अधिकारी व कर्मचार्‍यांना अडगळीत न बसता सुसज्ज इमारतीमध्ये बसून असणारे काम सहजपणे करून महसूल विभागातील असलेले काम जलद गतीने करून गतिमान प्रशासन होण्यास मदत होणार आहे.

प्रांताधिकारी कार्यालय हे सध्या शासकीय बंगल्यात असले तरीही तहसील कार्यालयाच्या दुसर्‍या मजल्यावर आता हे कार्यालय होणार आहे. त्यासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. प्रांताधिकारी कार्यालयासह इतर शासकीय कार्यालये या ठिकाणी एकाच इमारतीमध्ये येतील

– आमदार मोनिका राजळे

हेही वाचा

अहमदनगर : काँग्रेसने ओबीसींना आरक्षणापासून वंचित ठेवले

कर्जत : लोखंडी प्लेटा चोरणारा जेरबंद

ठाणे : बारवी धरणाची पाणीपातळी ७०.६४ फुटांवर; सतर्कतेचा इशारा

Back to top button