

करंजी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : पाथर्डी तालुक्यातील वैजू बाबळगाव येथील सरपंच ज्योती संतोष घोरपडे यांच्यासह त्यांचे पती, सासरे, दीर व घरातील लहान मुलांना घरी येऊन लोखंडी दांडक्यासह कुर्हाडीने जबर मारहाण करण्यात आली. याप्रकरणी सेवा संस्थेचे चेअरमन बाळासाहेब घोरपडे यांच्यासह इतर सात लोकांवर पाथर्डी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सरपंच ज्योती घोरपडे यांनी फिर्याद दिली आहे. शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास राजकीय वैमनस्यातून बाळासाहेब बाबासाहेब घोरपडे, ज्ञानेश्वर बाबासाहेब घोरपडे, सुशील बाबासाहेब घोरपडे, नितीन शिवनारायण घोरपडे, किशोर उत्तम घोरपडे, अंबादास उत्तम घोरपडे, गणेश विठ्ठल घोरपडे, उत्तम नामदेव घोरपडे (सर्व रा. वैजुबाभुळगाव, ता. पाथर्डी) यांनी आमच्या घरात घुसून माझ्यासह, पती व लहान मुलांना जबर मारहाण केली. ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या पराभवाचा वचपा काढण्यासाठीच माझ्या कुटुंबातील व्यक्तींना मारहाण करून गावात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न त्यांच्याकडून झाल्याचे सरपंच घोरपडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
सरपंच ज्योती घोरपडे यांच्यासह कुटुंबाला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ व आरोपींवर कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी मंगळवारी (दि.25) करंजी येथे वैजूबाभळगाव ग्रामस्थांच्या वतीने रास्तारोको आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
हेही वाचा