अहमदनगर : शिक्षण परिषद शनिवारी नकोच! अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी | पुढारी

अहमदनगर : शिक्षण परिषद शनिवारी नकोच! अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाची मागणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र राज्यामध्ये शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या 1 सप्टेंबर 2016 च्या परिपत्रकानुसार दरमहाच्या शिक्षण परिषदेचे आयोजन केले जात आहे. राज्यातील अन्य जिल्ह्याप्रमाणे दरमहा होणारी शिक्षण परिषद ही शनिवार ऐवजी इतर शालेय कामकाजाच्या दिवशी घेण्यात यावी,अशी मागणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य संघटक राजेंद्र निमसे व जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम यांनी दिली.

केंद्र सरकारने सर्व शिक्षा अभियानांतर्गत पूर्वी होत असलेल्या गट संम्मेलनांचा निधी बंद केल्यामुळे ही गटसंमेलने बंद करण्यात आली. तद्नंतर राज्यामध्ये प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम अंतर्गत शिक्षण परिषदेचे आयोजन केले जात असून यामध्ये प्रगत शाळा, डिजिटल शाळा, मोठ्या प्रमाणावर समाजाचा सहभाग मिळवणार्‍या शाळा, आयएसओ 9001 नामांकित शाळा मधील शिक्षक, केंद्रप्रमुख विस्ताराधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांचे सादरीकरण करण्यात येते.

अहमदनगर जिल्हा परिषदेच्या 2 जुलै 2021 च्या जिल्हा शिक्षण समिती सभेमध्येअखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाच्या मागणीवरून तत्कालीन उपाध्यक्ष प्रताप शेळके यांचे अध्यक्षतेखाली व शिक्षण सदस्य राजेश परजणे व उज्वला ठुबे यांनी दरमहाच्या शिक्षण परिषदेचे कामकाज शनिवार ऐवजी इतर शालेय दिवशी घ्यावे. यासाठी पुढील आवश्यक कारवाई करावी, असा बैठकीत ठराव घेऊन पुढील कार्यवाहीसाठी कार्यवाही करण्यासाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी यांना निर्देश दिले होते.

मात्र याबाबत कोणताही निर्णय न घेतल्याने शिक्षण परिषदा या शनिवारीच होत राहिल्या. जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांच्या समन्वय संघाने या शिक्षण परिषदेवर बहिष्कार टाकला. परिणामी सुमारे अकरा महिन्यांपासूनच्या बहिष्कारामुळे जिल्ह्यामध्ये शिक्षण परिषदेचे आयोजन केले जात नाही. याबाबत जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था संगमनेरचे प्राचार्य भगवान खारके यांच्याशी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने संवाद साधला असून दरमहाच्या शिक्षण परिषदेबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होणार असल्याचे प्राचार्य खारके यांनी संघटनेस अवगत केले आहे.

विभागीय आयुक्त नाशिक यांच्या अनुपालन अहवालानुसार नाशिक जिल्हा परिषदेने शिक्षण परिषदेसाठी महिन्यातील तिसर्‍या बुधवारची निवड केलेली आहे. त्यानुसार अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ व ऐक्य मंडळाने शिक्षण परिषद ही दर महिन्याच्या तिसर्‍या मंगळवारी किंवा शुक्रवारी आयोजित करून शाळा सकाळी दहा ते एक व शिक्षण परिषद दुपारी दोन ते पाच अथवा शाळा सकाळी आठ ते अकरा व शिक्षण परिषद दुपारी बारा ते तीन या वेळेत होणे बाबतचे निवेदन देऊन योग्य ते निर्देश होण्याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे विनंती केली आहे.

दरमहाच्या शिक्षण परिषदेचे आयोजन हे शनिवार ऐवजी इतर शालेय दिवशी झाल्यास ही शिक्षण परिषद अतिशय परिणामकारक व आनंदी वातावरणात होऊन सर्व शिक्षक हे समाधानी होतील असा विश्वास संघाचे जिल्हा सरचिटणीस सुनील शिंदे व जिल्हा कार्याध्यक्ष शरद वांढेकर, ऐक्य मंडळाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश नवले यांनी व्यक्त केला आहे.

238 दिवस अन् 1124 घड्याळी तास ..

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने आरटीई कायदा – 2009 अंतर्गत शालेय कामाचे वार्षिक दिवस व त्या अनुषंगाने होणारे वार्षिक घड्याळी तास या बाबतचा गोषवारा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला आहे. अहमदनगर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक कामाचे दिवस 238 इतके असून या दिवसांनुसार वार्षिक कामाचे घड्याळी तास हे सुमारे 1124 होत असल्यामुळे आरटीई कायद्यानुसार 1 हजार इतके तास अध्यापन बंधनकारक असतानाही 124 तास जादा अध्यापन होत असल्यामुळे शालेय दिवशी शिक्षण परिषदांचे आयोजन झाल्यास विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होणार नाही

हेही वाचा

मणिपूर, राजकारण अन् संसदेतला गदारोळ

दै. पुढारी नगर आवृत्तीच्या वर्धापनदिनी वाचनपंढरीच्या वारकर्‍यांची मांदियाळी

सांगली : दामदुपटीच्या आमिषाने 56 लाखांचा गंडा

Back to top button