सांगली : दामदुपटीच्या आमिषाने 56 लाखांचा गंडा | पुढारी

सांगली : दामदुपटीच्या आमिषाने 56 लाखांचा गंडा

सांगली :  गुंतवणूक रकमेला 12 महिन्यांत दुप्पट परतावा देण्याच्या आमिषाने शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, सुनीता मोरे यांच्यासह तिघांना 55 लाख 63 हजार रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. याप्रकरणी सह्याद्री ट्रेडर्स डेव्हलोपर्स प्रा. लि. या कंपनीच्या तीन संचालकाविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुजाता पांडूरंग इंगळे (रा. काकानगर, कर्नाळ रस्ता, सांगली), मनोज अशोक पाटील (आष्टा, ता. वाळवा) व सचिन दादासाहेब यादव (चोपडी, ता. सांगोला) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. बजरंग पाटील यांची 14 लाखांची, सुनीता मोरे यांची 27 लाख तीन हजाराची व महेश पांडूरंग मासाळ यांची 14 लाख 60 हजाराची फसवणूक झाली आहे. याप्रकरणी सुनीता मोरे यांनी फिर्याद दिली आहे. फसवणुकीचा हा प्रकार 2020 मध्ये घडला.

काँग्रेस भवनजवळ सह्याद्री ट्रेडर्स डेव्हलोपर्स प्रा. लि. या कंपनीचे कार्यालय होते. संशयितांनी गुंतवणूक रकमेला 12 महिन्यात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. त्यामुळे बजरंग पाटील, सुनीता मोरे व महेश मासाळ यांनी रक्कम गुंतवविली. संशयितांनी विश्वासहर्ता म्हणून या तिघांना चार धनादेश व नोटरी करून दिली. केवळ त्यांना 15 लाख 57 हजार रुपयांचा परतावा दिला. पुन्हा कोणताही परतावा दिला नाही. पाटील, मोरे व मासाळ यांनी संशयितांकडे उर्वरित परताव्याची रकमेची मागणी केली. मात्र ते टाळाटाळ करून लागले. काही दिवसानंतर त्यांनी कंपनीचे कार्यालय बंद केले.

गेल्या तीन वर्षापासून पाटील यांच्यासह तिघेजण संशयितांकडे गुंतवलेली रक्कम तरी परत करावी, अशी मागणी करीत आहेत. मात्र ते टाळाटाळ करू लागले. त्यामुळे तिघांच्यावतीने मोरे यांनी फिर्याद दिली. त्यानुसार संशयितांविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. अजून कोणाला अटक केलेली नाही. आणखी काही जणांची फसवणूक झाली असेल, तर तक्रार करण्यात पुढे यावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे. फसवणुकीचा आकडा वाढला तर हा तपास आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविला जाणार आहे.

Back to top button