अजितदादांच्या राष्ट्रवादीची धुरा नगरमध्ये विधाते, खोसेंकडे!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर शहर जिल्हाध्यक्षपदी प्रा. माणिक विधाते यांची तर शहर जिल्हा कार्याध्यक्षपदी अभिजीत खोसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसे पत्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आज मुंबईत दोघांनाही दिले. विधाते, खोसे हे नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांचे कट्टर समर्थक आहेत. राजकीय भूकंपानंतर आ. जगताप यांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला आहे. आ. जगताप दादांच्या राष्ट्रवादीसोबत असल्याने विधाते, खोसे हेही तिकडेच गेले.
पक्षविरोधी भूमिका घेतली म्हणून शरद पवार राष्ट्रवादीच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी खोसे, विधाते यांचे निलंबन केले होते. या निलंबनाला 24 तास उलटत नाहीत, तोच खोसे, विधाते यांच्यावर अजित पवारांच्या राष्ट्रवादीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार, आ. संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी अभिजीत खोसे, प्रा. माणिक विधाते यांना नियुक्तीचे पत्र दिले. अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा विस्तार करण्याची जबाबदारी आता या दोघांवर येऊन पडली आहे.
पवार, घुले जिल्हाध्यक्षपदाच्या चर्चेत
नगर जिल्ह्यातही दादांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची नियुक्ती केली जाणार आहे. जिल्हाध्यक्ष पदासाठी माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, कपिल पवार, बाळासाहेब पवार यांच्या नावाची चर्चा आहे. जिल्हा पदाधिकारी नियुक्तीनंतर तालुकाध्यक्षांच्या नियुक्ती केली जाणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वीच या नियुक्त्या केल्या जाणरा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
हेही वाचा