अहमदनगर : जैन मुनींच्या हत्येबाबत कारवाई करावी; आ. संग्राम जगताप यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी | पुढारी

अहमदनगर : जैन मुनींच्या हत्येबाबत कारवाई करावी; आ. संग्राम जगताप यांची उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : कर्नाटकात बेेळगाव जिल्ह्यातील जैनाचार्य कामकुमारनंदीजी यांच्या हत्येच्या घटनेची कर्नाटक सरकारने दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार संग्राम जगताप यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
यासंदर्भात जगताप यांनी फडणवीस यांना निवेदन दिले, त्या वेळी आमदार सर्वश्री सुनील टिंगरे, देवेंद्र भुयार, नितीन पवार आणि आशुतोष काळे आदी उपस्थित होते. बेळगाव जिल्ह्यातील चिकोडी तालुक्यात 5 जुलै 2023 रोजी जैनाचार्य कामकुमारनंदीजी यांची अत्यंत क्रूर पद्धतीने हत्या करण्यात आली.

जैन साधू-संतांप्रती जैन धर्मीयांच्या अस्मिता, संवेदनशील भावना असतात. वारंवार घडणार्‍या अशा घटना जैन समाजासाठी, तसेच सर्व मानवजातीला फारच वेदनादायी, मनाला हेलावून टाकणार्‍या आहेत. याचबरोबर मागील काही दिवसांपासून वारंवार प्राचीन जैन तीर्थांवर होणारे अतिक्रमण, तसेच जैन साधू-संतांच्या विहारादरम्यान घडवून आणलेले अपघात, या सर्व बाबी जैन समाजाच्या आस्थेवर घाला घालणार्‍या आहेत.

सदर हत्येची सीबीआयमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी. गुन्हेगारांवर फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून लवकरात लवकर न्याय द्यावा. भविष्यात अशा घटना घडणार नाहीत, याची खबरदारी घेण्यात यावी. तसेच प्राचीन जैन तीर्थांवर होणार्‍या अतिक्रमणांबाबत योग्य त्या उपाययोजना कराव्यात. जैनाचार्य कामकुमारनंदीजी यांच्या हत्येच्या घटनेची कर्नाटक सरकारने गांभीर्यपूर्वक दखल घेऊन तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी आमदार जगताप यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे केली आहे.

हेही वाचा

तुटलेल्या पायर्‍या अन् छतातून गळती ; साडेसतरानळी येथे महापालिकेच्या संपर्क कार्यालयाची दुरवस्था

अहमदनगर : इमामपूर घाटात ट्रक 200 फूट खोल दरीत कोसळला

खारघर दुर्घटनेचा चौकशी अहवाल 15 दिवसांत सभागृहासमोर ठेवा : जयंत पाटील

Back to top button