तुटलेल्या पायर्‍या अन् छतातून गळती ; साडेसतरानळी येथे महापालिकेच्या संपर्क कार्यालयाची दुरवस्था | पुढारी

तुटलेल्या पायर्‍या अन् छतातून गळती ; साडेसतरानळी येथे महापालिकेच्या संपर्क कार्यालयाची दुरवस्था

हडपसर : पुढारी वृत्तसेवा :  साडेसतरानळी या गावचा पाच वर्षांपूर्वी महापालिकेत समावेश झाला आहे. नागरिकांच्या सोयीसाठी प्रशासनाने या ठिकाणी संपर्क कार्यालय उभारले आहे. मात्र, सध्या त्याची दुरवस्था झाल्याने कर्मचार्‍यांच्या जीवितास धोका निर्माण झाला तसेच नागरिकांचीही गैरसोय होत आहे. या गावातून वर्षाला लाखो रुपयांचा महसूल जमा केला जातो. मग कार्यालयाच्या देखभाल व दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष का? असा प्रश्न उपस्थित करीत या कार्यालयाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

महापालिकेत समावेश होण्यापूर्वी तत्कालीन ग्रामपंचायत प्रशासनाने या इमारतीमध्ये सुधारणा करून विविध सुविधा देत हे कार्यालय लोकाभिमुख बनविले होते. मात्र, या गावचा महापालिकेत समावेश झाल्यानंतर या इमारतीच्या देखभाल व दुरुस्तीवर एक रुपयादेखील खर्च करण्यात आला नाही. कार्यालयात प्रवेश करतानाच तुटलेल्या पायर्‍या नागरिकांचे स्वागत करीत आहेत. सर्व पायर्‍यांवरील फरशा सध्या उखडून गेल्या आहेत.

कार्यालयात येणारे नागरिक आणि कामगारांना येथून प्रवास करताना वारंवार अपघाती परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. कार्यालयाच्या खिडक्यांच्या काचा फुटून त्या उघड्या पडल्या आहेत. त्यामागील फायबर पडदेही तुटलेले आहेत. छताखाली असलेले पीओपीचे फायबर शीट तुटून पडले आहेत. छताचे पत्रेही खराब होऊन पावसाच्या पाण्याची आत गळती होत आहे. त्यामुळे येथे काम करणार्‍या कर्मचार्‍यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

सहायक आयुक्त कार्यालयाला देखभाल व दुरुस्तीसाठी केवळ अकरा लाख रुपये मिळतात. त्यामध्ये सहायक आयुक्त कार्यालय, शाळा, समाजमंदिरे आदींचा समावेश आहे. साडेसतरानळी येथील संपर्क कार्यालयाच्या दुरुस्तीचे एस्टिमेट करण्यास सांगितले आहे. ते अधिक झाल्यास मुख्य खात्याकडून निधीची मागणी करून या कार्यालयाची दुरुस्ती करण्यात येईल.
         – प्रसाद काटकर, सहायक आयुक्त, हडपसर-मुंढवा क्षेत्रीय कार्यालय

स्वच्छतागृहाची झाली कचराकुंडी
या कार्यालयात असलेल्या स्वच्छतागृहाची कचराकुंडी झाली आहे. त्यामुळे त्याचा वापरही करता येत नाही. रात्रीच्या वेळी काही नागरिक त्याच्या आडोशाने उघड्यावरच लघुशंकेला जातात. त्यामुळे कर्मचारी व कामानिमित्त कार्यालयात येणार्‍या नागरिकांना दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागत आहे. या कार्यालयाचीे देखभाल व दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

हेही वाचा : 

ठाकरे-गडाख-कर्डिलेंचे चाललेय तरी काय? चर्चेला उधाण

धक्कादायक ! चार लाख लुटण्यासाठी भर रस्त्यात व्यापार्‍यावर गोळीबार

Back to top button