पारनेर : कारखान्यासाठी सभासद शेतकर्‍यांची वज्रमूठ! | पुढारी

पारनेर : कारखान्यासाठी सभासद शेतकर्‍यांची वज्रमूठ!

पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील देवीभोयरे येथील पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या जमिनीचा निकाल नुकताच सभासदांच्या बाजूने लागलेला आहे. लवकरच शेतकरी, सभासद कारखान्याचा ताबा घेणार असून, यासाठी जनजागृती मोहीम कारखाना बचाव समितीने हाती घेतली आहे. कारखाना कार्यक्षेत्रात गावोगावी बचाव समिती बैठकांचे आयोजन करून जनजागृती करत आहे. पारनेर तालुक्यातील उत्तरेकडील बागायती पट्टा असलेला मांडवे खुर्द परिसरात कारखाना बचाव व पुर्नजिवन समितीच्या कार्यकर्त्यांनी एक बैठक आयोजित केली होती.

या बैठकीला मांडवे, देसवडे, तास, वनकुटे परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी सभासद हजर होते. पारनेर साखर कारखाना भ्रष्ट मार्गाचा वापर करून पुण्यातील क्रांती शुगर या खासगी कंपनीने कसा बळकावला, याची सविस्तर माहिती सभासदांना देण्यात आली. कारखाना विक्री मागे कोणाचा हात होता, तो का विकण्यात आला, त्यामुळे पारनेरकरांवर कसा अन्याय झाला, याची सविस्तर माहिती बचाव समितीचे रामदास घावटे यांनी दिली. कारखाना विषयीचे विविध खटले सध्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात दाखल असून, ते निकालाच्या अंतिम टप्प्यात आहेत.

याचीही सविस्तर माहिती घावटे यांनी सभासदांना दिली. पारनेर साखर कारखान्याचे आता पुर्नजिवन होत असून, काारखान्याचे 20 हजार सभासद आहेत. त्यांचे सभासदत्व आता जिवंत होणार असल्याची माहिती बबनराव सालके यांनी दिली. यावेळी पारनेर कारखाना बचाव समिती व महसूल मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या अभिनंदनाचा ठराव मंजूर करण्यात आला. यावेळी मांडवे खुर्द परिसरातून मोठ्या संख्येने शेतकरी, सभासद उपस्थित होते.

‘लढाईत मांडवे खुर्दची साथ’

पारनेर साखर कारखान्याच्या अंतिम टप्प्यातील लढाईत मांडवे खुर्द परिसर सदैव बचाव समितीच्या पाठीशी राहून साथ देईल, असे आश्वासन ऊस बागायतदार जगदीश गागरे यांनी दिले.

‘तर जशाच तसे उत्तर देऊ’

पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या न्यायालयीन लढाईत समितीचा विजय झालेला आहे. आता, या पुढील लढाईत बचाव समितीला पूर्ण साथ द्यावी, असे आवाहन शेतकरी संघटनेचे संतोष वाडेकर यांनी केले. निकालानंतर आता ताबा घेतला जाईल, त्यावेळी कुणी हरकत, अडथळा निर्माण केला तर जशाच तसे उत्तर देऊ, अशी भावना मांडवेतील ज्येष्ठ सभासदांनी व्यक्त केली.

हेही वाचा

Panvel Landslide : पनवेल -चिंचपाडा हद्दीत शिलात, ओवेळे पुनर्वसित गावाजवळ भूस्खलन

शिक्षक भरतीची प्रक्रिया दोन टप्प्यांत; स्थगिती उठविली

खडकीत टोळक्याने वाहने फोडली ; दहशत पसरविण्याचा प्रयत्न

Back to top button