अंकुश चत्तर हत्याकांड : एकविरा चौकात 35 मिनिटे चालला ‘थरार’! | पुढारी

अंकुश चत्तर हत्याकांड : एकविरा चौकात 35 मिनिटे चालला ‘थरार’!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : अंकुश चत्तर यांच्या खुनाच्या कटात समावेश असलेल्या राजू फुलारी आणि अरूण पवार या दोन आरोपींना तोफखाना पोलिसांनी बुधवारी (दि.19) अटक केली. ‘मला तुमच्याशी बोलायचे आहे, थोडावेळ थांबा’, असे म्हणून फुलारी यानेच एकविरा चौकात अंकुश चत्तर यांना थांबवून ठेवले होते. त्यानंतर चत्तर यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. हा थरार सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाला आहे. तब्बल 35 मिनिटे सिनेस्टाईल राडा करून चत्तर यांचा खून करण्यात आला. पोलिस ठाण्याच्या हद्दीत एवढी गंभीर घटना घडत असताना पोलिस इतका वेळ काय करीत होते? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

अंकुश चत्तर यांच्या खुनातील मुख्य आरोपी स्वप्नील शिंदेसह सात आरोपींना एलसीबीने बेड्या ठोकल्या होत्या. मात्र, घटना घडल्यापासून राजू फुलारी हा पसार होता. तर, सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अरूण पवार हा आरोपी पोलिसांनी निष्पन्न केला होता. या दोन्ही आरोपींना तोफखाना पोलिसांच्या पथकाने बुधवारी अटक केली. फुलारी याला मनोरी (ता.राहुरी) व पवार याला बोल्हेगाव (ता.नगर) येथून अटक करण्यात आली

. राजू फुलारी याने अंकुश चत्तर यांना घटनास्थळी थांबवून भाजपचा नगरसेवक स्वप्नील शिंदे व त्याच्या इतर पंटरांना बोलावून घेतले होते. त्यानंतर चत्तर यांच्या डोक्यात लोखंडी रॉड, केबल, काचेच्या बाटल्यांनी मारून जखमी करण्यात आले. चत्तर हे जखमी झाल्यानंतर त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांचा काही तासांतच मृत्यू झाला. फुलारी व पवार या दोघांना तोफखान्याचे पोलिस निरीक्षक मधुकर साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक समाधान सोळंके, दत्तात्रय जपे, सुनील शिरसाठ, सतीश त्रिभुवन यांच्या पथकाने अटक केली.

सिनेस्टाईल राडा अन् क्रूरपणे खून

राष्ट्रवादीचा पदाधिकारी असलेला अंकुश चत्तर यांना ठार मारण्याआधी एकविरा चौकात मोठा सिनेस्टाईल राडा झाला. सुरुवातीलच्या दहा ते पंधरा मिनिटात झालेले भांडण मिटल्यानंतर स्वप्नील शिंदे व त्याच्या पंटरांनी एकविरा चौकात येऊन चत्तर यांच्यावर हल्ला चढविला. हा सर्व प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्‍यात कैद झाला आहे.

आरोपींना 24 पर्यंत पोलिस कोठडी

राजू फुलारी व अरूण पवार या दोघांना बुधवारी न्यायालयात हजर केले असता, 24 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. चत्तर यांना घटनास्थळी फुलारी याने थांबवून ठेवल्याने त्याच्याकडून इतरही खुलासे होणार असल्याची शक्यता आहे.

हेही वाचा

भाजपने फिरविली भाकरी; निष्ठावंतांना मिळाली संधी

‘द्वितीय वर्ष पदविकाच्या जागा अद्ययावत करा’ ; तंत्रशिक्षण संचालनालयाचे निर्देश

अहमदनगर : कोतवाली पोलिसांकडून 27 गोवंशीय जनावरांची सुटका

Back to top button