‘द्वितीय वर्ष पदविकाच्या जागा अद्ययावत करा’ ; तंत्रशिक्षण संचालनालयाचे निर्देश | पुढारी

‘द्वितीय वर्ष पदविकाच्या जागा अद्ययावत करा’ ; तंत्रशिक्षण संचालनालयाचे निर्देश

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशासाठी प्रवेशासाठीचे संपूर्ण वेळापत्रक घोषित करण्यात आलेले आहे. त्यानुसार लवकरच प्रवेश फेर्‍यांची सुरुवात होणार आहे. त्यासाठी संस्थेमधील अभ्यासक्रमनिहाय उपलब्ध जागा व अन्य माहिती अद्ययावत करावी, असे स्पष्ट निर्देश तंत्रशिक्षण संचालनालयाने पदविका अभ्यासक्रमाच्या संस्थांच्या प्राचार्यांना दिले आहेत. तंत्रशिक्षण संचालनालयाचे प्रभारी संचालक डॉ. विनोद मोहितकर यांनी दिलेल्या निर्देशानुसार, अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली यांची मान्यता, शासन मान्यता तसेच महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ, मुंबई यांची संलग्नता या कागदपत्राच्या आधारे शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये ज्या संस्थांचा समावेश प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेत करण्यात आला होता.

अशा संस्थांमध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 करिता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेशासाठी प्रथम वर्षात रिक्त राहिलेल्या जागा व प्रथम वर्षाकरिता मान्य असलेल्या प्रवेशक्षमतेच्या 10 टक्के जागांची गणना करून प्रवेशासाठी उपलब्ध जागांची निश्चिती करण्यात येते. शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शासकीय, अशासकीय अनुदानित व विनाअनुदानित अभियांत्रिकी पदविका संस्थेतील विद्यार्थ्यांचे पहिल्या वर्षानंतर पाठ्यक्रम बदल तसेच संस्था बदल करण्याबाबतची कार्यवाही पूर्ण झालेली आहे. तरी सदर माहितीची संवेदनशीलता व कालमर्यादा लक्षात घेता संबंधित संस्थांनी येत्या 20 जुलै 2023 पर्यंत प्रवेश प्रक्रियेच्या संकेतस्थळावर अद्ययावत करावी.

प्राचार्य जबाबदार राहणार
उपलब्ध जागांची माहिती प्रवेश प्रक्रियेदरम्यान जागावाटपात दर्शविण्यात येणार असल्याने संबंधित माहितीत कोणतीही चूक झाल्यास तसेच माहिती 20 जुलैपर्यंत अद्ययावत न केल्यास व पर्यायाने प्रवेश प्रक्रियेमध्ये काही अडचणी उद्भवल्यास त्यास सर्वस्वी संबंधित संस्थेचे प्राचार्य जबाबदार राहतील, असे डॉ.मोहितकर यांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button