

नगर : पुढारी वृत्तसेवा : ग्रामपंचायत निवडणुकीतील निवडणूक खर्चाचा हिशेब वेळेत आणि विहित नमुन्यात सादर केला नसल्यामुळे 440 उमेदवार आगामी पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरण्याची शक्यता आहे. यासाठी लवकरच या उमेदवारांना सुनावणीत बाजू मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार्या उमेदवारांना निवडणुकीसाठी केलेल्या दैनंदिन खर्चाचा हिशेब देणे बंधनकारक आहे. यासाठी निकाल जाहीर झाल्यानंतर 30 दिवसांची सवलत दिली जात आहे.
जानेवारी 2021 ते मे 2022 व जून 2022 ते सप्टेंबर 2022 या कालावधीत मुदत संपलेल्या संगमनेर, नगर, राहुरी व कर्जत या तालुक्यांतील प्रत्येकी 3, श्रीगोंदा तालुक्यातील 2 व शेवगाव तालुक्यातील 1 अशा एकूण 15 ग्रामपंचायतींच्या 4 ऑगस्ट 2022 मध्ये सार्वत्रिक निवडणूक होऊन 5 ऑगस्ट 2022 रोजी मतमोजणी झाली. 5 सप्टेंबर 2022 पर्यंत उमेदवारांना निवडणूक खर्च सादर करण्याची मुदत होती. 315 उमेदवारांपैकी 53 उमेदवारांनी खर्चच सादर केला नाही.
अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या 18 सप्टेंबर 2022 रोजी सार्वत्रिक निवडणुका झाल्या. 19 सप्टेंबरला मतमोजणी झाली. 19 ऑक्टोबरपर्यंत 718 उमेदवारांपैकी 387 उमेदवारांनी वेळेत निवडणूक खर्च सादर केला नाही. एकंदरीत 60 ग्रामपंचायतींच्या 440 उमेदवारांनी वेळेत खर्च सादर केला नसल्याचे पुढे आले आहे. विजयी उमेदवारांनी खर्च सादर न केल्यास त्यांचे सदस्यत्व रद्द होते. पराभूत उमेदवारांना मात्र, आगामी पाच वर्षे निवडणूक लढविण्यास अपात्र ठरविले जात आहे. निवडणूक खर्च सादर न करणार्या 440 उमेदवारांना जिल्हाधिकारी यांनी आयोजित केलेल्या सुनावणीत बाजू मांडण्याची संधी उपलब्ध होणार आहे. खर्च सादर न करणार्या
उमेदवारांची संख्या ः अकोले 387, संगमनेर 21, नगर 17, कर्जत 15.