अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : आयसीटीसी प्रशिक्षिणात उत्तम कामगिरी केल्या बद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या हस्ते जिल्हा परिषद, नगर पालिका शाळेतील शिक्षकांचा पारितोषिक वितरण कार्यक्रम सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाला. जिल्ह्यातील प्रथम येणार्या 80 शाळांना कॉम्पुटर लॅब, लॅपटॉप, कोडींग कीट, स्मार्ट ढत, टॅबलेट्स अशी डिजिटल संसाधने पारितोषिक स्वरूपात देण्यात आले. या समवेतच कोर्स यशस्वीपणे पूर्ण करण्यार्या 333 शिक्षकांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले या साहित्याचा अहमदनगर जिल्हयातील या 80 शाळांतील शिक्षक व विद्यार्थी याना संगणक शिक्षण घेण्यासाठी वापर होणार आहे.
या प्रसंगी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, संगमनेर व शालेय शिक्षण विभाग, जिल्हा परिषद अहमदनगर आणि अमेझॉन फ्युचर इंजिनिअर व लीडरशिप फॉर इक्विटी, पुणे यांच्या वतीने राबविण्यात आलेल्या कॉम्पुटर सायन्स टीचींग एक्सेलंस प्रोग्राम मध्ये उत्तम कामगिरी करणार्या अहमदनगर जिल्ह्यातील एकूण 80 शिक्षकांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य भगवान खारके, उपशिक्षणाधिकारी विलास साठे, शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कारले व तुकाराम लाळगे, रविराज निंबाळकर मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, हा उपक्रम शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य आणि ऍमेझॉन फ्युचर इंजिनीअर यांचा संयुक्त कार्यक्रम असून महाराष्ट्रातील 9 जिल्ह्यांमध्ये राबविला गेला. कॉम्प्युटेशनल थिंकिंग आणि ब्लॉक बेस्ड कोडींगच्या माध्यमातून शिक्षकांना 21 व्या शतकातील कौशल्यांची ओळख करून देणे.
सदर कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थीना वर्गामध्ये 21 व्या शतकातील कौशल्ये आणि कोडिंग शिकविण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले आहे. या माध्यमातून शासकीय शाळांमधील विद्यार्थ्यांना संगणक विज्ञानातील नवी संकल्पना आत्मसात करण्याची संधी उपलब्ध झाली. यावेळी येरेकर यांनी यशस्वी शिक्षकांचे अभिनंदन केले तसेच या कोर्समध्ये मिळविलेले ज्ञान इतर सहकारी शिक्षकांपर्यंत पोहचवावे अशा सूचना केल्या. आर्टिफिशियल इंटेलिजेनसमुळे भविष्यात शिक्षण क्षेत्रात कशा प्रकारे बदल होणार आहेत याची माहिती दिली.
शिक्षक म्हणून बदलणार्या काळाची कौशल्ये शिक्षकांनी आत्मसात करावी असे आवाहन त्यांनी शिक्षकांना केले. लीडरशिप फॉर इक्विटी संस्थेमार्फत अहमदनगर जिल्हयामध्ये राबविल्या जाणार्या शैक्षणिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले. प्रास्ताविक डाएट संगमनेर अधिव्याख्याता रामेश्वर लोटके यांनी केले. शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री कारले यांनी आभार मानले.
हेही वाचा