पिंपरी : पोलिसांविरोधात बोगस तक्रारींचा पाऊस; गृह विभागाने  घेतली दाखल  | पुढारी

पिंपरी : पोलिसांविरोधात बोगस तक्रारींचा पाऊस; गृह विभागाने  घेतली दाखल 

संतोष शिंदे
पिंपरी(पुणे) : पोलिसांविरोधात काही समाजकंटक जाणीवपूर्वक निनावी अर्जाद्वारे खोट्या तक्रारी करत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर गृह विभागाने खोट्या तक्रारदारांना चाप बसावा; तसेच खर्‍या तक्रारींना योग्य न्याय मिळावा, यासाठी आता ठोस पाऊले उचलण्यास सुरुवात केली आहे. गृहविभागाकडून याबाबत नुकतेच एक परिपत्रक जारी करण्यात आले आहे. यामध्ये अर्ज चौकशीबाबत तपासी अधिकार्‍यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

निनावी तक्रारींमुळे मनोबलावर परिणाम

समाजातील काही कुप्रवृत्तीचे लोक खोटया, दिशाभूल करणार्‍या अनेक निनावी तक्रारी करीत असतात. याचा शासनाच्या साधनसंपत्तीवर, तसेच अधिकारी व कर्मचारी यांच्या मनोबलावर विपरीत परिणाम होतो. बोगस व निनावी तक्रारी अर्जाच्या वाढत्या तपसांमुळे खर्‍याखुर्‍या तक्रारदारांकडे दुर्लक्ष होते.

असंबद्ध आरोपाची दखल नको

ज्या तक्रारीमध्ये असंबद्ध आरोप आहेत, अशा तक्रारी देखील तक्रारदाराची तपासणी न करता दप्तरी दाखल करण्यात याव्यात, असा निर्णय गृहविभागाकडून घेण्यात आला आहे. पिंपरी- चिंचवडमध्ये मागील काळात दोन पोलिस आयुक्तांच्या विरोधात देखील कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे बोगस अर्ज करण्यात आले होते. त्यावरही चुकीची नावे देण्यात आल्याचे चौकशीत समोर आले.

तक्रारदाराच्या नावाची खातरजमा

दखल घेण्यासारखे आरोप केले असल्यास अशा तक्रारींच्या संबंधात प्रशासकीय विभागाने दखल घ्यावी. सक्षम प्राधिकार्‍याच्या मान्यतेने तक्रारदाराने स्वतः तक्रार केली आहे की नाही, याबाबत खात्री करुन घेण्यात यावी. याबाबीत तक्रारदाराकडून 15 दिवसांमध्ये प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे. तक्रारदाराने आपण स्वतः तक्रार केल्याचे मान्य केल्यास, अशा तक्रारीवर कार्यवाही करताना तक्रार अर्जदाराचे नाव व पत्ता झाकून तक्रारीची छायांकित प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणेकडे पाठवावी, असे परिपत्रकात नमूद आहे.

निनावी अर्ज होणार दप्तरी दाखल

ज्या तक्रारीमध्ये तक्रारदाराचे नाव, पत्ता नमूद केलेला नाही, अशा निनावी तक्रारींमध्ये कोणत्याही स्वरुपाची माहिती अंतर्भुत असली तरीही त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, असे परिपत्रकात नमूद आहे. अशा प्रकारच्या तक्रारी दप्तरी दाखल करण्यात याव्यात, असेही तपासी अधिकार्‍यांना सुचित करण्यात आले आहे. त्यामुळे यापुढे तक्रारदारांना स्वतःचे नाव व पत्ता स्पष्ट नमूद करूनच तक्रार करता येणार आहे.
गृह विभागाकडून आलेल्या सूचनेनुसार तक्रार अर्जांचे निवारण करण्याचे काम सुरू आहे. यापूर्वी तसेच, नुकतेच आलेल्या परिपत्रकानुसार निनावी अर्ज दप्तरी दाखल करण्याच्या सूचना यामध्ये देण्यात आल्या आहेत.
– देवेंद्र चव्हाण, पोलिस निरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी, 
पिंपरी- चिंचवड 
हेही वाचा

Back to top button