"अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची परवानगी मिळावी" माहिती अधिकार कार्यकर्त्याची मागणी | पुढारी

"अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची परवानगी मिळावी" माहिती अधिकार कार्यकर्त्याची मागणी

कोपरगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते संजय काळे यांनी गट विकास अधिकारी व गट शिक्षणाधिकार्‍यांना पत्राद्वारे केली आहे. दरम्यान, काळे यांच्या पत्रामुळे शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. पत्रामध्ये काळे म्हणाले, राज्य शासनाची प्राथमिक व माध्यमिक शाळांमध्ये मोफत पोषण आहार योजना सुरु आहे. कोपरगाव तालुक्यात विद्यार्थी सेवण करीत असलेला पोषण आहार निश्चितच उच्च दर्जाचा असणार.  त्यामुळे हा पोषण आहार चाखण्याचा उपक्रम सोमवार 10 जुलैपासून सुरु करणार आहे. कुठल्याही शाळेला पूर्वकल्पना न देता पोषण आहाराची चव घेणार आहे. तालुक्यात प्रत्येक शाळेत किती वाजता पोषण आहार शिजतो, विद्यार्थ्यांना किती वाजता दिला जातो, याची शाळा निहाय उपलब्ध दस्तातील माहिती तत्काळ ईमेलवर पाठवावी. मी निश्चय केला आहे की, दररोज शाळेत जाऊन विद्यार्थी जो पोषण आहार सेवन करतात, त्याची चव मी घेणार आहे. यासाठी अर्धी वाटी पोषण आहार चाखण्याची परवानगी मिळावी.

पोषण आहाराबाबत नियमावली जाहीर केली आहे. मुख्य म्हणजे, शाळेत पोषण आहार आल्यानंतर अन्न पुरवठा करणार्‍या व्यक्तीस प्रथम आहाराची चव खाण्यास द्यावे. नंतर अर्ध्या तासाने विद्यार्थ्यांना अन्न वाटप करण्याची सूचना करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्यापूर्वी त्याचा नमुना बाजूला काढून ठेवण्याची सूचना करण्यात आली आहे. कच्चे, बेचव अन्न, कमी स्निग्धांश, अन्नाला आंबूस वास, भेसळी अन्न विद्यार्थ्यांना वितरीत करू नये. आहाराचा नमुना महिन्यातून कमीत- कमी एकदा किंवा आवश्यकेतनुसार जास्त वेळा प्रयोग शाळेत पाठवावा. संस्थेच्या स्वयंपाकगृहास भेट देऊन स्वयंपाकगृह आरोग्यदायी आहे की नाही, याची खात्री करावी, अशा सूचना आहेत, परंतु या सूचनांचे कितपत पालन केले जाते, हे पाहणे आता उत्सुकतेचे आहे.

हे ही वाचा : 

नगर : अजित पवारांच्या बैठकीला आदिक यांची उपस्थिती

पुणे : वाहतुकीच्या बेशिस्तीवर शासकीय वाहनांद्वारे वॉच

Back to top button