नगर : अजित पवारांच्या बैठकीला आदिक यांची उपस्थिती | पुढारी

नगर : अजित पवारांच्या बैठकीला आदिक यांची उपस्थिती

 श्रीरामपूर (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे एकेकाळचे घनिष्ठ मित्र दिवंगत गोविंदराव आदिक यांचे चि. अविनाश आदिक कुणाला साथ देणार? याकडे राज्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, नुकत्याच मुंबई येथे झालेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बैठकीस त्यांनी उपस्थिती लावली असल्याने चर्चेला पूर्ण विराम मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर जिल्ह्यातील सर्वच आमदार व पदाधिकार्‍यांनी आपण कोणाच्या सोबत आहोत? याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली, परंतु राष्ट्रवादीचे सरचिटणीस अविनाश आदिक तसेच श्रीरामपूर नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा अनुराधा आदिक यांनी कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नव्हती.

मुंबई येथे खा. शरद पवार तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपले पाठबळ सिध्द करण्यासाठी बैठकांचे आयोजन केलेले होते. या बैठकीस अविनाश आदिक व अनुराधा आदिक हे उपस्थित होते. प्रदेश सरचिटणीस पदाचे काम पाहणारे अविनाश आदिक हे दोन्ही पवारांशी चांगले संबंध ठेवून आहेत. त्यांचे वडील दिवंगत गोविंदराव आदिक हे मात्र अनेक वर्षे शरद पवार यांचे घनिष्ठ मित्र होते. शरद पवार हे पुण्यातील बृहन्महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्सचे विद्यार्थी होते तर गोविंदराव आदिक हे त्यावेळी गरवारे महाविद्यालयात शिक्षण घेत होते. विद्यार्थी दशेपासूनच पवार व आदिकांचे संबंध प्रस्थापित झाले होते.

सध्या अविनाश आदिक हे राज्यातील मोठ्या पदावर कार्यरत आहेत. शिवाय शरद पवार कुटुंबियांशी त्यांचे असलेले जुने नाते आहे. त्यामुळे आदिकांच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष होते, परंतु उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बैठकीला दोघेही भावंड उपस्थित होते. यामुळे आता राजकीय चर्चा तुर्त थंडावणार आहे.

हे ही वाचा : 

Pakistan fuel crisis : पाकच्या आर्थिक तंगीचा परिणाम लष्करावरही!

सांगली : बापरे! तुरुंगातूनच दरोड्यांचे ‘प्लॅन’

Back to top button