नगर : शेतकर्‍यांच्या खात्यावर 15 कोटी वर्ग : राजेंद्र नागवडे | पुढारी

नगर : शेतकर्‍यांच्या खात्यावर 15 कोटी वर्ग : राजेंद्र नागवडे

काष्टी (नगर ) : पुढारी :  सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्याने सन 2022-23 हंगामातील उसाचे 225 रूपये प्रती मट्रिक टनाप्रमाणे द्वितीय पेमेंटचे 15 कोटी रूपये सभासद शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग करून एफआरपीची रक्कम पूर्ण केली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन राजेंद्र नागवडे यांनी दिली. नागवडे म्हणाले, सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे कारखान्याने सन 2022-23 गाळप हंगामात प्रथम हप्ता रुपये 2300 प्रती मेट्रिक टनाप्रमाणे पेमेंट केलेले होते. सदर गळीत हंगामात गाळप केलेल्या उसाचे द्वितीय पेमेंट 225 रूपये प्रती मेट्रिक टन याप्रमाणे दिले असून, त्याची पंधरा कोटींची रक्कम सभासद शेतकर्‍यांच्या खात्यात वर्ग केली आहे. मागील सीझनमधील उसास 2525 प्रमाणे पेमेंट अदा केलेले असून, येणारी दिवाळी सुद्धा गोड करणार असल्याची माहिती नागवडे यांनी दिली.

तसेच, ऊसतोड वाहतूकदार यांचे तोड वाहतूक व कमिशनचे पेमेंट पूर्णपणे अदा केले असून, पुढील गळीत हंगामासाठी करार सुरू करण्यात आलेले आहेत. नागवडे कारखान्याने कायम ऊस उत्पादक सभासद शेतकरी, ऊसतोड मजूर, मुकादम, कष्टकरी, कामगार यांच्या हिताचा विचार केलेला असून, त्यांना योग्य न्याय दिलेला आहे. कामगारांचे दोन महिन्यांचे वेतन अदा केले असून, उर्वरित पेमेंट पुढील महिन्यात देण्यात येणार असल्याचे नागवडे यांनी सांगितले.

स्व. शिवाजीराव बापू नागवडे यांच्या विचार प्रेरणेने सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखाना ऊस भावामध्ये कधीही मागे राहणार नाही व सभासद शेतकर्‍यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. त्यामुळे ऊस वाहतूकदार यांनी लवकरात लवकर करार करावेत व सभासद शेतकर्‍यांनी आपला ऊस नागवडे कारखान्यास देऊन उच्चांकी गाळप करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन राजेंद्र नागवडे यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाबासाहेब भोस, संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक आर. एस. नाईक आदी उपस्थित होते.

हे ही वाचा : 

नगर : अतिवृष्टीग्रस्त शेतकरी मदतीपासून वंचित

पुणे : दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद

Back to top button