Maharashtra Cabinet Expansion | अजित पवार यांच्याकडे वित्त खाते? | पुढारी

Maharashtra Cabinet Expansion | अजित पवार यांच्याकडे वित्त खाते?

मुंबई; चंदन शिरवाळे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत रविवारी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचे खातेवाटप अंतिम टप्प्यात आले आहे. भाजपची महसूलची ऑफर असताना, वित्त खाते मिळविण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांना अखेर यश आल्याचे समजते. भाजपकडील गृहनिर्माण, वित्त, महिला व बालविकास, ग्रामविकास, दुग्धविकास, अन्न व नागरी पुरवठा; तर शिंदे गटाकडील कृषी, सामाजिक न्याय ही दोन खाती राष्ट्रवादीला दिल्याचे समजते. (Maharashtra Cabinet Expansion)

ग्रामीण भागाशी संबंध असलेल्या खात्यांसाठी अजित पवार आग्रही होते. त्यानुसार दिलीप वळसे-पाटील यांना ग्रामविकास, छगन भुजबळ-गृहनिर्माण, दुग्धविकास-हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे-कृषी, अनिल पाटील-अन्न आणि नागरी पुरवठा, आदिती तटकरे-महिला व बालविकास, तर सामाजिक न्याय खाते संजय बनसोडे यांना दिले जाणार असल्याचे समजते.

अजित पवार यांनी निधीवाटपात दुजाभाव केल्याचा आरोप करत शिंदे गटाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र केला होता. आता ते स्वतःच सत्तेत आल्यामुळे मंत्रिपदाची स्वप्ने पाहणार्‍या शिंदे गटाचे टेन्शन वाढले आहे. महसूल आणि गृह खाते मिळणार नाही, हे गृहीत धरून अजित पवार यांनी वित्त खात्यासाठी आग्रह धरला होता. त्यामुळे शिंदे गटाच्या आमदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नाराजी व्यक्त केली होती. मात्र, निधीवाटप करताना आपण कोणावरही अन्याय करणार नाही. इतकेच नाही, तर सध्या मूळ राष्ट्रवादीत असलेल्या आमदारांबाबतही दुजाभाव करणार नसल्याचे अजित पवार यांनी नुकतेच स्पष्ट केले आहे. वित्त खाते सांभाळणार्‍या फडणवीस यांचीही मौन संमती पाहून शिंदे गटाने आपल्या विरोधाची धार बोथट केली आहे.

छगन भुजबळ हे ग्रामविकाससाठी आग्रही होते. महाविकास आघाडी सरकारमध्ये त्यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाची जबाबदारी होती. त्यामुळे त्यांनी पुन्हा हाच विभाग घ्यावा, असे सांगण्यात आले; पण त्यांनी मंत्रिपदाची पहिल्यांदाच शपथ घेणारे अनिल पाटील यांचे या खात्यासाठी नाव सुचवत नकार दिला. वळसे-पाटील यांच्याकडे ग्रामविकास जाणार असल्यामुळे त्यांनी या खात्याचाही आग्रह धरला नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री, गृहसारखे महत्त्वाची खाते सांभाळलेल्या भुजबळ यांनी गृहनिर्माणला पसंती दिली. शिवसेनेत बंड करून काँग्रेसमध्ये आल्यानंतर त्यांच्यावर गृहनिर्माणची जबाबदारी सोपवली होती.

सध्या मंत्रिमंडळात एकही महिला नाही. त्यामुळे महिला व बालविकास विभाग आदिती तटकरे यांच्याकडे दिला जाणार आहे. सध्या हे खाते मंगलप्रभात लोढा यांच्याकडे आहे. खाते काढून घेण्याच्या बदल्यात त्यांनी गृहनिर्माणला पसंती दिली होती; पण हे खाते त्यांच्या व्यवसायाशी संबंधित असल्यामुळे त्यांना नकार देण्यात आला. मुंडे यांनी यापूर्वी सामाजिक न्याय विभाग चांगल्याप्रकारे सांभाळला आहे. त्यांना या खात्याचीच अपेक्षा होती; पण खातेवाटपात अजित पवार यांनी विविध सामाजिक घटकांचा विचार केल्यामुळे सामाजिक न्याय विभाग बनसोडे यांच्याकडे सोपवणार असल्याचे समजते. (Maharashtra Cabinet Expansion)

 

Back to top button