नगर : पाझर तलावांचे दुरूस्ती काम निकृष्ट | पुढारी

नगर : पाझर तलावांचे दुरूस्ती काम निकृष्ट

नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यातील इमामपूरमध्ये दोन पाझर तलावांच्या दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून, सदर कामाची चौकशी करण्याची मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
इमामपूर येथे मुख्यमंत्री जलसंवर्धन योजनेंतर्गत महादेव मंदिर पाझर तलाव, तसेच पालखी तलाव दुरुस्तीसाठी  51 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याबाबत ग्रामस्थांनी तक्रारी केल्या. त्यानंतर सरपंच, उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी प्रत्यक्ष कामाची पाहणी करून काम बंद केले.

पाझर तलावाच्या पिचिंगचे काम व्यवस्थित करण्यात आले नाही. तसेच भरावावरील झाडे काढण्यात आली नाहीत. काम उरकून घेऊन बिल काढण्याचा प्रयत्न ठेकेदार व संबंधित अधिकारी करताना दिसून येतात. सांडव्याचे काम देखील व्यवस्थितरित्या करण्यात येत नाही. संबंधित कामात संपूर्णतः मनमानी सुरू असल्याचे दिसून येते. त्याबाबत जिल्हा जलसंधारण अधिकार्‍यांना निवेदन देऊन सदर कामाची सखल चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. इमामपूर गावात उन्हाळ्यात नेहमीच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवत असून, टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. या बाबीचा विचार करत आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या प्रयत्नातून दोन पाझर तलाव दुरुस्तीसाठी निधी देण्यात आला. परंतु सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने सरकारचा पैसा वाया जाणार आहे. त्यामुळे सदर कामाची सखोल चौकशी करून संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली.

काम निकृष्ट होत असल्याबाबतची कल्पना अधिकार्‍यांना दिल्यानंतर त्यांच्याकडून काम बंद करण्याचे, तसेच उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याचे सरपंच मोकाटे यांनी सांगितले. सदर पाझर तलावाची गळती थांबल्यास इमामपूर ग्रामस्थांचा उन्हाळ्यात पिण्याचा पाणीप्रश्न मार्गी लागणार आहे. त्यामुळे सदर कामाचा दर्जा हा चांगला रहावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे. आमदार तनपुरे यांनी सदर कामाचे भूमिपूजन करताना संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांना कामाचा दर्जा चांगला राखण्याबाबत सक्त ताकीद दिली होती. परंतु आज त्यांच्या आदेशाला हरताळ फासल्याचे दिसून येत आहे. संबंधित ठेकेदार व अधिकार्‍यांची चौकशी करून कारवाईची मागणी जिल्हा जलसंधारण अधिकारी यांच्याकडे करण्यात आली.

बहिरवाडी तलावाचे कामही निकृष्ट
बहिरवाडी येथे दोन पाझर तलाव दुरुस्तीचे काम सुरू आहे. ते कामही निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी केल्या आहेत. बहिरवाडीही उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करते. त्यामुळे तेथील पाझर तलाव दुरुस्तीचे कामही चांगलेे व्हावे, तसेच त्या कामाची देखील चौकशी करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली.

दोषींवर कारवाई करा : मोकाटे
डोंगर उतारावर इमामपूर वसल्याामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच भूजल पातळी वाढते, तर उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवते. त्यामुळे उन्हाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागतो. पाझर तलावाचे काम चांगले झाल्यास पिण्याचा पाणीप्रश्न काही अंशी सुटेल. या कामाची चौकशी करून दोषी आढळणार्‍यांवर तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी सरपंच भीमराज मोकाटे यांनी केली आहे.

हे ही वाचा :

राज ठाकरेंना आजमावून बघा, नाशिकमध्ये मनसेची फलकबाजी

Sharad Pawar : नवी दिल्‍ली महापालिकेने शरद पवारांचे पोस्टर्स, होर्डिंग्स हटवले

Back to top button