नगर : रुग्णवाहिकेस कार धडकून एक ठार | पुढारी

नगर : रुग्णवाहिकेस कार धडकून एक ठार

वाळकी : पुढारी वृत्तसेवा :  नगर-दौंड महामार्गावर खडकी (ता.नगर) शिवारातील हॉटेलच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 108 रुग्णवाहिकेला भरधाव कारने धडक दिली. त्यात कार मधील एकाचा मृत्यू झाला असून, तीनजण जखमी झाले आहेत. मंगळवारी (दि.4) सायंकाळी पाच वाजता हा अपघात झाला. याबाबत रुग्णवाहिका चालक विशाल गोरख तरटे (रा. तांदळी दुमाला, ता. श्रीगोंंदा) यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादी विशाल तरटे शासकीय 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेवर चालक असून, तो श्रीगोंद्यातून एका रुग्णाला घेऊन नगरमध्ये आला होता.

नगरच्या रुग्णालयात रुग्णाला सोडून तो पुन्हा श्रीगोंद्याकडे जात असताना खडकी शिवारात असलेल्या जगदंबा हॉटेलमध्ये चहा पिण्यासाठी थांबला होता. त्याने रुग्णवाहिका हॉटेलच्या पाकिर्र्ंगमध्ये उभी केली होती. सायंकाळी पाच वाजता नगरहून श्रीगोंद्याकडे चाललेल्या कारचालकाचे कारवरील नियंत्रण सुटून कार उभ्या असलेल्या रुग्णवाहिकेवर जाऊन धडकली. मोठा आवाज झाल्याने हॉटेलमधील अनेक जण बाहेर धावत आले.

कारमध्ये चारजण प्रवास करीत होते. त्यातील उमेश हनुमंत्र जाधव (वय 45, रा.कुसेगाव, ता.खटाव, जि.सातारा) यांचा जागीच मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले. अपघातानंतर जखमींना 108 रुग्णवाहिकेतून उपचारासाठी नगरला हलविण्यात आले. पोलिसांनी कार चालक चंद्रशेखर दत्तात्रय जगदाळे (रा.कुसेगाव, ता.खटाव, जि.सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

 हे ही वाचा : 

NCP Crisis : बडव्यांमुळे आज आम्ही बाहेर पडलो, आम्ही भाजपत गेलेलो नाही : छगन भुजबळ

Maharashtra Politics : शिंदे आता स्टॅन्डबाय मुख्यमंत्री; एकनाथ खडसे यांचा हल्लाबोल

Back to top button