नगरमध्ये झाला अनोखा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा; चिनी शानने संगमनेरच्या राहुलशी बांधली आयुष्याची गाठ

नगरमध्ये झाला अनोखा आंतरराष्ट्रीय विवाह सोहळा; चिनी शानने संगमनेरच्या राहुलशी बांधली आयुष्याची गाठ

संगमनेर (नगर), पुढारी वृत्तसेवा: सध्या भारत आणि चीनबरोबरचे संबंध तणावपूर्ण आहेत. मात्र, अशात चीनची कन्या शान हिचे संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील व सध्या चीनमध्ये योगाचे शिक्षण घेणाऱ्या राहुल हांडे बरोबर सुत जुळले. दोघांचे मनोमिलन झाले. चीनच्या मुलीची आपल्या नातेवाईकांशी ओळख व्हावी म्हणून राहुल आणि शान या नव दाम्पत्याने मोठ्या फाइव स्टार हॉटेलमध्ये नव्हे तर चक्क आपल्याच माय भूमीतील घारगाव सारख्या खेडेगावातील एका मंगल कार्यालयात मराठी संस्कृती प्रमाणे सात फेरे घेत आपल्या सुखी संसाराला सुरुवात केली आहे.

संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील राहुल हांडे या तरुणाने संगमनेर महाविद्यालयाच्या योगा विभागात योगाचे धडे गिरवले आणि या विषयातील पुढील शिक्षण घेण्यासाठी तो भारत देश सोडून थेट सातासमुद्राच्या पलीकडे असणाऱ्या चीन देशात गेला. तिथे योगाचे धडे गिरवत होता, त्याचवेळी त्याची ओळख शानशी झाली. त्यानंतर त्या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. राहुल याने आई वडिलांची भेट घेत लग्न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. त्यांनीही मोठ्या मनाने होकार दिला.

अहमदनगर जिल्ह्याच्या संगमनेर तालुक्यातील पठार भागातील पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकरवर अवलंबून राहणाऱ्या तसेच दुष्काळ कायमच पाचवीला पुजलेल्या भोजदरी या छोट्याशा गावातील २९ वर्षीय राहुल हांडे याने चक्क ३१ वर्षीय शान यान छांग या चीनी तरूनीशी चायनीज पध्दतीने कोर्ट मॅरेज केले. तीन ते चार दिवसांपुर्वी तिला भारत देशातील महाराष्ट्रात असणाऱ्या एका भोजदारी सारख्या एका डोंगर दऱ्याखोऱ्यात असणाऱ्या छोट्याशा गावाची सून करून आणले.

महाराष्ट्रीयन पद्धतीने दोन ते तीन दिवसांपासून या आंतरराष्ट्रीय विवाहाची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात होत होती. अखेर लग्न घटीका जवळ आली. दोघांच्या हातावर मेहंदी रंगली आणि शान राहुलला हळद लागली. भटजीने शुभ मंगल सावधान झाल्यानंतर दोघांनी एकमेकाच्या गळ्यात वरमाला घातली. यानंतर राहुल याने लग्नाला आलेल्या सर्व नातेवाईकांशी शानची ओळख करून दिली. महाराष्ट्रीयन रूढी परंपरा तिला समजावुन सांगितल्या.

या आंतरराष्ट्रीय विवाह सोहळ्यास शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. संजय मालपाणी, माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, आंबी दुमालाचे सरपंच जालिंदर गागरे, संगमनेर महाविद्यालयाच्या योग विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. राजेंद्र वामन अण्णासाहेब वाडेकर, एनएसयुआयचे अध्यक्ष गौरव डोंगरे, छावा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष खंडू सातपुते यांच्यासह राहुल हांडेचे नातेवाईक मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी घारगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. कामेश टावरे यांनी शानशी चायनीज भाषेत संवाद साधला .

राहुल हांडे या भोजदरीच्या तरुणाने चिनी शान या तरुणीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला हे ऐकून आम्हाला अगोदर धक्काच बसला. परंतु, त्याच्या करिअरच्या दृष्टीने त्यांनी घेतलेला निर्णय योग्य आहे. शानमध्येच आम्ही राहुलचे भवितव्य पाहिलेले आहे. त्यामुळे कोणाचाही त्याच्या लग्नाला विरोध झाला नाही. लग्नासाठी त्यांचे आई-वडील इतर नातेवाईक सुद्धा येणार होते. परंतु, काही कारणास्तव त्यांना व्हिसा मिळाला नाही. त्यामुळे ते येऊ शकले नाही. नंतर कधीतरी ते नक्कीच भोजदारीला येतील
-सौ शोभा हांडे (नवरदेव राहुलची आई)

हेही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news