सहकार पाठबळास मोदींचे नेतृत्व जगमान्य : बिपीनराव कोल्हे | पुढारी

सहकार पाठबळास मोदींचे नेतृत्व जगमान्य : बिपीनराव कोल्हे

कोपरगाव (नगर ) : पुढारी वृत्तसेवा:  शेती आणि शेतकरी हा विकसीत भारताचा प्रमुख कणा असून सहकाराला पाठबळ देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व अल्पावधीत जगमान्य झाले आहे. गेल्या चार वर्षात पंतप्रधान शेतकरी स्वाभीमान योजनेतून अडीच लाख कोटी रुपयांचे अर्थसहाय्य केले असल्याचे प्रतिपादन संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनराव कोल्हे यांनी केले. भारतीय राष्ट्रीय सहकारी संघ नवी दिल्ली यांच्यावतीने आयोजित केलेल्या दोन दिवसीय सतराव्या भारतीय सहकारी महापरिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांच्या हस्ते शनिवारी झाले. त्यात दुरदृष्यप्रणालीच्या सहाय्याने देशातील कोटयावधी शेतकर्‍यांशी पंतप्रधानांनी संपर्क साधला.

त्यात सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर ऑनलाईन पध्दतीने बिपीनराव कोल्हे व सहकार्‍यांनी सहभाग घेतला त्याप्रसंगी ते बोलत होते. याप्रसंगी उपाध्यक्ष रमेश घोडेराव, संचालक विश्वासराव महाले, आप्पासाहेब दवंगे, बापूसाहेब बारहाते, त्रंबकराव सरोदे, रमेश आभाळे, निवृत्ती बनकर, विविध संस्थांचे संचालक, शेतकरी, सभासद्, कार्यकारी संचालक बाजीराव सुतार, विविध खातेप्रमुख, उपखातेप्रमुख, विभागप्रमुख उपस्थित होते.

कोल्हे पुढे म्हणाले, गेल्या नऊ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय मंत्रीमंडळाने विकसीत भारताच्या उज्वल भवितव्यासाठी असंख्य योजना सुरू करून त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करून सहकार क्षेत्रात शेतकर्‍याबरोबरच, दुग्धोत्पादनात महिला सबलीकरणावर भर दिला. मनुष्याचे कोविड लसीकरणाच्या धर्तीवर देशातील सर्व शेतकर्‍यांच्या पशुधनाचे लसीकरण त्यांनी हाती घेतले आहे. सहकार क्षेत्रात होत असलेल्या बदलाची प्रत्येकाने चर्चा करून आर्थिक समृध्दीसाठी जाणिवपुर्वक प्रयत्न करावेत. शेवटी उपाध्यक्ष रमेश घोडेराव यांनी आभार मानले.

शेतकर्‍यांना थेट कृषी योजनांचा लाभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संवाद साधतांना सांगितले, सहकारात डिजीटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत आहे. 60 हजार बँकांचे संगणकीकरण पुर्ण झाले आहे. शेतकर्‍यांच्या हातात थेट पध्दतीने केंद्र व राज्यस्तरावरील कृषी योजनांचा लाभ दिला जात आहे. महाराष्ट्र राज्यात सहकारी साखर कारखानदारीची चळवळ मोठी असुन साखर कारखान्यांना इथेनॉल उत्पादन करण्यासाठी विशेष सहाय्य करून देशात 70 हजार कोटी रूपयांचे इथेनॉल खरेदी करून वेगळा उच्चांक स्थापन केला. जगात युरिया खताच्या एका गोणीसाठी अमेरिकेत 3 हजार, चीन 2 हजार 100, पाकीस्तान 800 बांगलादेशात 720 रूपये मोजावे लागतात. पण भारतात केवळ 270 रूपयापर्यंत शेतकर्‍यांना युरिया खत उपलब्ध करून दिले जात आहे.

हे ही वाचा :

राजगुरू स्मारकासाठी पहिल्या टप्प्यात दीडशे कोटी देणार : वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

पुणे शहरात 24 तासांत 20 मिमी बरसला

 

 

Back to top button