

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यात सोमवारपर्यंत किरकोळ ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. गेल्या 24 तासांत सरासरी 8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेवगाव व कोपरगाव तालुक्यांत सरासरी 22 मिलिमीटर पाऊस झाला. सर्वदूर होत असलेल्या पावसाने पेरणीला वेग आला आहे. गेली चार वर्षे सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. यंदादेखील अधिक पावसाची अपेक्षा आहे. परंतु रोहिणी आणि मृग या दोन नक्षत्रांत पाऊसच झाला नाही.
त्यामुळे पेरणी रखडली होती. मात्र, गेल्या सहा दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात पाऊस हजेरी लावत आहे. शनिवारी सर्वदूर पाऊस झाला. सरासरी 22 मि.मी. पावसाची नोंद झाली. बुधवारीदेखील पावसाने सर्वदूर हजेरी लावली. शेवगाव तालुक्यात 22, नेवासा 16.5, अकोले 14.9, कोपरगाव 22.1, जामखेड 9.7, श्रीरामपूर 8.1 मि.मी. पावसाची नोंद झाली. आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 56.5 मि.मी. पावसाची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत 55 मि.मी. पाऊस कमी झाला आहे. हवामान खात्याने 29 जून ते 3 जुलै या कालावधीत पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. काही ठिकाणी किरकोळ तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
हेही वाचा