पांडुरंगा लई नाही मागणे! | पुढारी

पांडुरंगा लई नाही मागणे!

बा पांडुरंगा, काल देवशयनी अर्थात आषाढी एकादशी! तुझ्या दर्शनाचा दिवस. तुझ्या अनुभूतीचा दिवस होता. भक्तांचा जनसागर तुझ्या भक्तिरसात चिंब भिजून गेला. त्याचबरोबर जलरूपांनी तू दिलेला आशीर्वाद संपूर्ण महाराष्ट्रभर धरतीमातेला नवजीवन देऊन गेला. महाराष्ट्रातील आम्हा सर्वसामान्य जनतेचा तारणहार तूच आहेस. आमचे सुख-दुःख, सर्व अडचणी यातून मार्ग काढून संसाररूपी नौका मार्गी लावणारा तूच आहेस. हे पांडुरंगा, हे श्री विठ्ठला, बरेच काही तुला मागावे असे आहे; पण यादी तरी कशी आणि किती मोठी करावी?

अठ्ठावीस युगे विटेवरी उभा असलेला तू आणि सोबत रखुमाई आमच्या श्रद्धेचे स्थान आहात. काहीही करा; पण हे देवा किमान काही मागण्या तरी मान्य करा. कुठे अतिपाऊस तर कुठे पाऊसच नाही, म्हणजेच कुठे ओला दुष्काळ, तर कुठे जीवघेणा कोरडा दुष्काळ! हे बंद करून हे देवा आधी बळीराजाला तृप्त आणि संपन्न करणारा पाऊस जसा पाहिजे तसा पडू दे, हीच तुझ्या चरणी आज प्रार्थना! तप्त उन्हाने भेगाळलेल्या शेत जमिनीला पावसाची बरसात करून तृप्त कर. म्हणजे मग, ही काळी आई धान्याचे भरभरून पीक आमच्या बळीराजाच्या पदरात टाकेल आणि आमचा कोमेजलेला शेतकरी पुन्हा डोलणार्‍या पिकासारखा बहरात येईल.

भक्तिभावाने ऊन-पाऊस यांची तमा न बाळगता पंढरीची वाट चालणार्‍या वारकर्‍यांच्या आत्मिक श्रद्धेचे तू प्रेरणास्थान आहेस; पण त्याचबरोबर या वारकर्‍यांना भौतिक सुविधा मिळतील, अशी व्यवस्था कर देवा. तू मनात आणलेस, तर काहीही करू शकतोस. सर्वसामान्यांचा देव म्हणून आमचा तुझ्यावर विश्वास आहे. तेव्हा देवा, सर्वप्रथम जसा पाहिजे तसा पाऊस सर्वत्र पडू दे! धनधान्याने शेतकर्‍यांच्या घरातील रिकाम्या जागा भरून जाऊ दे! धान्य कुठे साठवावे, हा गेल्या कित्येक वर्षांत न पडलेला प्रश्न त्याला यावर्षी पडू दे! शेतकरी सुखी तर समाज सुखी, तरच राज्य आणि देश सुखी राहील, हे आम्ही तुला सांगायची गरज नाही. तू अंतर्यामी आहेस, निर्गुण, निराकार पण सर्वव्यापी आहेस; पण देवा निर्विकार होऊ नकोस. आधी आमच्या बळीराजावर कृपा कर!

संबंधित बातम्या

दुसर्‍या आणखी एका गोष्टीकडे तुझे लक्ष वेधू इच्छितो. पापी लोक हातात कोयता, सुर्‍या, चाकू घेऊन मुलींवर, महिलांवर वार करत सुटले आहेत. या नराधमांना असे न करण्याची बुद्धी दे! परंतु, त्यांच्यातील आसुर प्रवृत्ती जागृत झाली, तर जसा परवा पुण्यात एका तरुणाच्या माध्यमातून तू एका मुलीला वाचवण्यासाठी आलास तसाच प्रत्येक वेळी धावून येत जा. घडणारा गुन्हा निर्विकारपणे पाहणार्‍या जनतेपेक्षा लढाऊ आणि साहसी युवकांच्या माध्यमातून तू वेळोवेळी आम्हाला दर्शन देत जा!

लहान-मोठ्या शाळांमधून, बालवाड्यांमधून यावर्षी दिंड्या आणि पालख्या निघाल्या. खरंच सांगतो देवा, मन हरखून गेले. ‘तुझा विसर न व्हावा’ ही शिकवण लहानपणापासून अंगी बाणवली, तर पुढे मोठी झालेली ही मुले नीतिमत्तेपासून दूर जाणार नाहीत, हा एक विश्वास मनामध्ये जागृत झाला. प्रत्येक वारकरी एकमेकांना आणि सर्व जनता या पंढरीच्या वारकर्‍यांना ‘माऊली’ असे संबोधते. स्त्री, पुरुष किंवा सर्वच प्रकारचे भेदाभेद अमंगळ ठरवून एका अनामिक ओढीने वारकरी जसा पंढरीच्या दिशेने चालतो तसेच या राज्यातील सर्व व्यवहार भेदाभेद सर्व अमंगळ या वृत्तीने चालत राहावेत, ही मागणी तुला नाही, तर कोणाला मागायची? हे देवा येते वर्षभर हे राज्य सुखासमाधानाने नांदू दे, हीच तुझ्या चरणी प्रार्थना! राम कृष्ण हरी..!

– झटका

Back to top button