अहमदनगर : तीन कुटुंबांचे पुनर्वसन ! समाजकल्याणमधून तिघांना शासकीय नोकरी | पुढारी

अहमदनगर : तीन कुटुंबांचे पुनर्वसन ! समाजकल्याणमधून तिघांना शासकीय नोकरी

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ऐन उमेदीच्या काळातच एका घटनेत वडिलांचे छत्र हरपले. कुटुंबात एकुलते असल्याने ज्या वयात शिक्षण घ्यायचे, जीवनाचा आनंद घ्यायचा, त्या वयात ‘त्या’ तिघांवर कुटुंबाची जबाबदारी पडली. मात्र, शासनाच्या समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून या कुटुंबांचे आता पुनर्वसन झाले आहे. संबंधित तीन कुटुंबांना सहायक आयुक्त राधाकिसन देवढे यांनी शासनाची आर्थिक मदत मिळवून दिलीच; शिवाय काल ‘त्या’ तिघांना शासकीय नोकरीतही सामावून घेण्याचे पत्र सुपूर्द केले.

अनुसूचित जाती-जमाती अधिनियम 1989 व सुधारित अधिनियम 2015 अ‍ॅट्रोसिटीअंतर्गत दाखल गुन्ह्यातील पीडित कुटुंबांतील वारसास शासकीय नोकरीत सामावून घेण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. यानुसार सहायक आयुक्त देवढे यांनी बुधवारी सामाजिक न्याय भवनात संकेत नामदेव सोनवणे यास जिल्हा परिषद सामान्य प्रशासन विभागात आणि राहुल संतोष साळवे व भागीनाथ राजेंद्र धीवर या दोघांना सार्वजनिक बांधकाम विभागात रुजू केल्याचे नियुक्तीपत्र देत पेढे भरवले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीचे अध्यक्ष सिद्धाराम सालीमठ यांनी हे आदेश दिले आहेत. दरम्यान, यापूर्वीही देवढे यांच्या पाठपुराव्यामुळे आकाश शेजवळ, दुर्गा आगे, अस्मिता गायकवाड यांना नोकरी मिळाली आहे.

आनंदाश्रू झाले अनावर! .

मला खरंच वाटलं नव्हतं की इतक्या लवकर शासकीय नोकरीचा लाभ मिळेल. मात्र वडिलांच्या मृत्यूला नऊ महिने उलटत नाही तोच आज माझ्या हातात नोकरीचे पत्र पडले. देवढे साहेबांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे आम्हाला आर्थिक आधार मिळालाच, आज नोकरीही मिळाली. त्यांचे ऋण कधीही विसरू शकत नाही, हे सांगत असतानाच संकेत सोनवणे याने आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली

मी तर फक्त संबंधित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी पाठपुरावा केला. खरे श्रेय जिल्हाधिकार्‍यांचे आहे. त्यांच्या आदेशानेच संबंधित तिघांना कमीवेळेत नोकरी मिळाली. उवर्रीत तरुणांना नोकरी देण्यासाठी प्रयत्न आहे.

– राधाकिसन देवढे,
सहायक आयुक्त, समाजकल्याण

हेही वाचा

अहमदनगरमध्ये शिक्षक संघाचे अधिवेशन; शरद पवार यांची उपस्थिती

नाशिक : गणेश कुंवर यांची १९ तासांत पंढरपूर सायकलवारी

पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची रस्त्यावर लावलेल्या स्टॉलकडे डोळेझाक

Back to top button