पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची रस्त्यावर लावलेल्या स्टॉलकडे डोळेझाक | पुढारी

पुणे : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाची रस्त्यावर लावलेल्या स्टॉलकडे डोळेझाक

खडकी  (पुणे ): पुढारी वृत्तसेवा : खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या हद्दीत अनेक दुकान व्यावसायिकांनी आपल्या दुकानासमोरील जागा स्टॉलधारकांना भाडेतत्त्वावर दिली आहे. दुकानाच्या बाहेर अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल लागत आहेत. हे स्टॉल चक्क रस्त्यावर येत असतानाही बोर्ड प्रशासन मात्र याकडे डोळेझाक करीत आहे. दुकानासमोरील जागा स्टॉलसाठी भाड्याने देणार्‍या दुकान व्यावसायिकांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी खडकीकर करीत आहेत.

काही दुकान व्यावसायिकांनी दुकानाच्या बाहेर स्टॉलसाठी जागा भाड्याने दिल्या आहेत. स्टॉलधारकांकडून प्रत्येक दिवशी 200 ते 400 रुपये भाडे वसूल करण्यात येत आहे. विशेष म्हणजे दुकानाच्या बाहेरील जागा कॅन्टोन्मेंट बोर्डाची असून, दुकान व्यावसायिक बोर्डाच्या जागेवर प्रचंड पैसे कमवत आहेत. या स्टॉलधारकांकडे कोणत्याही प्रकारचे व्यावसायिक परवानेदेखील नसल्याचे नागरिकांनी सांगितले.
काही अधिकार्‍यांचे अशा दुकान व्यावसायिकांसोबत हितसंबंधदेखील असल्याची चर्चा खडकीकरात रंगली आहे. प्रशासन अशा दुकान व्यावसायिकांवर कारवाई करणार का, असा प्रश्न आता खडकीकर उपस्थित करीत आहेत.

गर्दीमुळे अपघाताची शक्यता…
काही दुकान व्यावसायिक दुकानासमोरील जागा सुमारे 5 ते 8 छोट्या स्टॉलधारकांना जागा भाड्याने देत आहेत. वडापाव, इडली सांबर, दालचा, मंचुरियन, जिलेबी आदींसाठी स्टॉल्स भाड्याने देत आहेत. स्टॉल चक्क रस्त्यावर मांडण्यात येत आहेत. गांधी चौक तसेच अन्य चौकात काही व्यावसायिकांनी स्टॉलसाठी जागा भाड्याने दिल्या आहेत. रस्त्यावर खाद्यपदार्थ तयार करण्यात येत असल्याने आरोग्याचाही प्रश्न आहे. खाद्यपदार्थ तयार करताना नागरिकांच्या गर्दीमुळे धक्का लागून अपघाताची शक्यता आहे. बोर्ड प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

तपासणीत सातत्य नाही
खडकी बाजार परिसरामध्ये सुमारे 40 ते 50 स्टॉलधारक आहेत. दुकानासमोर अनेक खाद्यपदार्थांचे लहान लहान स्टॉल लावण्यात येतात. यांच्याकडे कोणत्याही प्रकारचे परवाने नाहीत. प्रशासनाच्या वतीने खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात येत नाही. केवळ हॉटेल, स्टॉलच्या साफसफाईबाबत बोर्ड प्रशासनाच्या वतीने तपासणी करण्यात येते. मात्र, तपासणीमध्ये सातत्य नाही.

काही व्यावसायिक दुकानासमोरची जागा भाड्याने देत असल्याबाबत माहिती मिळाली आहे. याबाबत कारवाई करणार आहे. दुकान व्यावसायिकांना महसूल विभागाच्या वतीने परवाने देण्यात येतात. याबाबत पाठपुरावा करण्यात येईल.
                                                              -शिरीष पत्की, आरोग्य अधीक्षक

Back to top button