शिर्डीच्या दर्शनबारीवरून तू-तू मैं-मैं! पालकमंत्री विखे पा.- आ. थोरात यांच्यात रंगला कलगीतुरा | पुढारी

शिर्डीच्या दर्शनबारीवरून तू-तू मैं-मैं! पालकमंत्री विखे पा.- आ. थोरात यांच्यात रंगला कलगीतुरा

शिर्डी(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : शिर्डीत श्रीसाईबाबांच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांना सोयी-सुविधा देण्यात साई संस्थान नेहमी आग्रही असते. असे असताना सुविधेचा एक भाग म्हणून सुमारे 180 कोटी रुपये खर्च करून अद्ययावत दर्शनबारी केवळ उद्घाटनाअभावी गेल्या काही दिवसांपासून पडून आहे. या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, अशी आग्रही भूमिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांची आहे तर दुसरीकडे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणतात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु श्रीसाई दर्शनासाठी येत असल्याने त्यांनी दर्शनबारीचे उद्घाटन करावे. एकूणच दोन परस्पर विरोधी नेत्यांचे वेगवेगळे मतप्रवाह निर्माण झाल्याने चर्चेला उधाण आले आहे.

दरम्यान, दर्शनबारीचे उद्घाटन नेमकं कुणाच्या हस्ते होणार, अशी श्रीसाईभक्तांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी जेष्ठ नेते आहेत. त्यांच्याबद्दल राजकीय विधाने करणे टाळले पाहिजे. ते उद्घाटनाला येणार असल्याचे त्यांनी मान्य केले आहे. त्यांना निमंत्रणही दिले आहे. ते त्यांनी स्वीकारले आहे. एवढं मोठं नेतृत्व आपल्याकडे येत आहे. स्वाभाविकपणे त्यांच्या तारखा मिळून, वेळ मिळून त्यांनी लवकर शिर्डीत यावं, अशी आपली अपेक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विश्व नेता म्हणून गौरविण्यात आले. याचा आपल्याला अभिमान आहे.

अमेरिकेत क्वचितच एखाद्या पंतप्रधान यांना सन्मान मिळतो. तो पहिल्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला. यामुळे अभिमानाने आपली छाती फुगते. त्यांच्या नेतृत्वाखाली काशी विश्वनाथचे कॉरिडॉर विकसित झाले. हे लोकांना स्वप्नात देखील वाटत नव्हते. श्रीराम मंदिराचा प्रश्न देखील निकाली लागला. एक कर्तव्यदक्ष नेता म्हणून माणसांच्या मना- मनामध्ये त्यांना मान्यता आहे. निश्चितपणे लवकर त्यांच्या हस्ते दर्शनबारीचे उद्घाटन व्हावे ही लोकांची भावना आहे, असे सांगत मंत्री विखे पा. म्हणाले, ते यावेत यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. आपण जेव्हा एखादा प्रकल्प करतो, तेव्हा त्याच्या पाठीमागच्या भावना जाणून घेतल्या पाहिजे. राष्ट्रपतीदेशातील सर्वोच्च व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांच्याबाबत अशी काही विधाने करणे सोडले पाहिजे. शेवटी ते राजकीय ज्येष्ठ नेते आहेत, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सत्ता गेल्याची अस्वस्थता प्रचंड आहे. त्यामुळे ते अशी विधान ते करतात. त्यांना एवढं गांभीर्याने घेण्याचे काही कारण नाही. काही पक्षाचे नेते मुख्यमंत्री ठरू लागले आहेत. त्यासाठी संख्याबळ लागते. काही लोकांना स्वप्न रंजन करायला आवडते, अशी टीका मंत्री विखे पा. यांनी आ. थोरात यांचे नाव न घेता केली.

दरम्यान, प्रसार माध्यमांशी बोलताना माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणाले, योगायोगाने देशाच्या महामहिम राष्ट्रपती श्रीसाई दर्शनासाठी येत आहेत. त्यांच्या हस्ते दर्शनबारीचे उद्घाटन व्हावे. दुसरीकडे भाविकांसाठी दर्शनबारी खुली होईल. त्यामुळे त्यांच्याच हस्ते उद्घाटन करावे, असा माझा आग्रह आहे, असे आ. थोरात यांनी स्पष्ट केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्घाटनाला येणार असे म्हणत, सहा महिने वाट पाहिली. आणखी किती दिवस वाट पहायची, असा सवाल उपस्थित करुन आ. थोरात म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दर्शनबारीचे उद्घाटन होणार असेल त्यावर कोणीही आक्षेप घेण्याचे काही कारण नाही, मात्र केवळ पंतप्रधान येणार आणि त्यांच्याच हस्ते उद्घाटन करायचं, म्हणून ते आत्तापर्यंत लांबविण्यात आले.

एवढं मोठं काम झालेले असतांना त्या कामाचा लाभ भाविकांना मिळत नाही, हेसुध्दा योग्य नाही. तुमची पाट कधीही थोपटून घ्या. येथे येऊन थोपटून घ्या, तेथे जाऊन थोपटून घ्या. आमचं काहीही म्हणणं नाही, मात्र भाविकांची दर्शनबारीत उभे राहून शांततेने श्रीसाईबाबांचे दर्शन घेण्याची संधी का घालवता, हे कळत नाही, असा सवाल आ. थोरात यांनी केला. दर्शनबारीचे काम पूर्ण झाले असताना देखील दर्शनाला उभे राहणे शक्य होते, परंतु पंतप्रधान येणार आणि उद्घाटन होणार यात ते लांबविले. यंदा प्रचंड कडक उन्हाळा असताना भाविकांना ती सुविधा मिळाली नाही.

उद्घाटन कोण करणार, हे लवकरच होणार स्पष्ट

सद्गुरु श्रीसाईबाबांच्या दर्शनबारीच्या उद्घघाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेत, अशी आग्रही भूमिका महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी घेतली आहे तर दुसरीकडे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात म्हणतात, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते उद्घाटन व्हावे. एकूणच दोन्ही नेत्यांमध्ये परस्पर विरोधी आरोप-प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगल्याने चर्चेला उधाण आल्याचे दिसते. उद्घघाटन कोण करणार, हे लवकरचं स्पष्ट होईल.

हेही वाचा

कोपरगाव : पाऊस नसताना वाहती झाली गोदामाई..!

भागानगरे हत्याकांड : संदीप गुडाला पुण्यातून घेतले ताब्यात; मुख्य तिन्ही आरोपींना अटक

अहमदनगर जिल्ह्यात 3500 शाळांसाठी अवघे 35 केंद्रप्रमुख!

Back to top button