कोपरगाव : पाऊस नसताना वाहती झाली गोदामाई..! | पुढारी

कोपरगाव : पाऊस नसताना वाहती झाली गोदामाई..!

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गोदावरी नदी पाऊस नसतानाही वाहती झाली. गोदावरी नदीवरील विविध बंधार्‍यांच्या फळ्या काढल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून साठविलेले पाणी वाहिल्याने डबक्यांसह साठलेले काळे, हिरवे पाणी वाहून जाऊन स्वच्छ पाणी वाहताना दिसत आहे. या पाण्याचे भाविक भक्तांनी पुजन केले. चालु पावसाळी हंगामात बिपरजॉय वादळामुळे शेतकर्‍यांचे शेतीचे गणित बिघडले. 20 दिवसांपासून पाऊस गायब आहे. विविध हवामानाचे अंदाज सोशल मीडियावर झळकत आहेत.

त्याद्वारे पाऊस महिनाभर लांबणीवर पडण्याची शक्यता वर्तवली. आज (शनिवार) पासून पाऊस पडणार असल्याचे बोलले जाते. शेतकर्‍यांनी दुबार पेरणीचे संकट टाळावे म्हणून पेरणी उशिरा करावी, असे आवाहन करण्यात आले. यामुळे गोदावरी नदीला पाणी नाही. आहे ते बंधार्‍यात साठलेल पाणी, मात्र कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍याच्या मालिका तालुक्यातील दोन्ही साखर कारखान्यांच्या माध्यमातून बांधल्याने व बंधार्‍यात टाकलेल्या फळ्या काढल्याने साठलेले पाणी नदीपात्रात पडत आहे. यामुळे कोपरगाव परिसरात पाऊस नसतानाही यंदा गोदावरी नदी वाहती झाल्याचे दिसले.

गोदावरीतून बेसुमार बेकायदा वाळू उपसा होत आहे. नदीत मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले आहेत. वर्षानुवर्षे कोपरगाव शहराचे सांडपाणी गोदावरी नदी प्रवाहात सोडले जाते. या पाण्यात बंधार्‍यात साठलेले स्वच्छ पाणी मिसळून ते पुढे वाहताना दिसते. कोल्हापूर पद्धतीच्या बंधार्‍यात साठलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी काठच्या शेतकर्‍यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला. जनावरांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.

हिंगणी बंधार्‍याच्या फळ्या काढल्या..!

गोदावरी नदीवरील हिंगणी बंधार्‍यात पाणी साठवले होते. बंधार्‍याला 77 मोर्‍या आहेत. त्यांच्या बहुतांश फळ्या काढल्या आहेत. कोपरगावला सध्या पाच दिवसात पाणी पुरवठा केला जातो. तोही अशुद्ध असल्याने पालिका प्रशासना विरोधात महिलांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

भागानगरे हत्याकांड : संदीप गुडाला पुण्यातून घेतले ताब्यात; मुख्य तिन्ही आरोपींना अटक

अहमदनगर जिल्ह्यात 3500 शाळांसाठी अवघे 35 केंद्रप्रमुख!

Back to top button