भागानगरे हत्याकांड : संदीप गुडाला पुण्यातून घेतले ताब्यात; मुख्य तिन्ही आरोपींना अटक

भागानगरे हत्याकांड : संदीप गुडाला पुण्यातून घेतले ताब्यात; मुख्य तिन्ही आरोपींना अटक

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : ओंकार भागानगरे हत्याकांडातील तिसरा मुख्य आरोपी संदीप गुडा याला तोफखाना पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री (दि. 24) पुण्यातील स्वारगेट बसस्थानकातून ताब्यात घेतले. भागानगरे हत्याकांडातील अटक केलेल्या आरोपींची संख्या सात झाली आहे. दरम्यान, संदीप गुडा याला सोमवारी न्यायालयाने 30 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. गणेश हुच्चे, नंदू बोराटे, संदीप गुडा या मुख्य आरोपींसह रेकी करून हल्लेखोरांना मदत करणार्‍या वैभव हुच्चे, सागर गुडा, रवी नामदे, अनिकेत सोळुंखे या आरोपींना अटक करण्यात आली आहे.

यातील संदीप गुडा याला 30 जूनपर्यंत तर इतर आरोपींना 27 जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. भागानगरे या तरुणाच्या खुनानंतर हल्लेखोरांनी नगरमध्येच मोबाईल बंद करून पोबारा केला होता. त्यानंतर एलसीबीने हल्लेखोरांना मदत करणार्‍या तिघांना अटक केली. मुख्य आरोपी सुरुवातीला शनिशिंगणापूर येथे गेले होते. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर येथे व तेथून नाशिक, पनवेल, मुंबई असा प्रवास करून ते पुणे येथे आले होते.

स्थानिक गुन्हे शाखेला गणेश हुच्चे व नंदू बोराटे पुणे रेल्वेस्थानकावर असल्याची माहिती मिळाली होती. एलसीबीने पुणे रेल्वेस्थानकातून हुच्चे व बोराटे या दोघांना अटक केली. नंतर हल्लेखोरांना मदत करणारा अनिकेत साळुंखे याला अटक केली. रविवारी तिसरा मुख्य आरोपी संदीप गुडा स्वारगेट बसस्थानकात असल्याची माहिती तोफखाना पोलिसांना मिळताच पथकाने पुणे गाठून गुडाला ताब्यात घेतले. गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक मधुकर साळवे करीत आहेत.

गुडा नेमका होता कुठे ?

गणेश हुच्चे व नंदू बोराटे या दोघांशी वाद झाल्याने संदीप गुडा छत्रपती संभाजीनगरपासून त्यांच्या सोबत नव्हता, असे एलसीबीचे प्रमुख दिनेश आहेर यांनी सांगितले. एलसीबीच्या पथकाने हुच्चे व बोराटेला अटक केली, तेव्हा संदीप गुडा त्याच्या सोबतच होता, असे तोफखाना पोलिसांचे म्हणणे आहे. त्यामुळे संदीप गुडा भागानगरे याच्या खुनानंतर नेमका होता कुठे? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news