अहमदनगर जिल्ह्यात खरीप पेरणीला येणार वेग; आर्द्रा नक्षत्राने दिला दिलासा | पुढारी

अहमदनगर जिल्ह्यात खरीप पेरणीला येणार वेग; आर्द्रा नक्षत्राने दिला दिलासा

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : दोन नक्षत्र कोरडेठाक गेल्यामुळे चिंतातूर झालेल्या बळीराजाला आर्द्रा नक्षत्राने मात्र दिलासा दिला आहे. शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील सर्वदूर पाऊस झाला. सरासरी 22 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. राहाता, पाथर्डी, शेवगाव, नेवासा, नगर, कोपरगाव या तालुक्यांत दमदार पाऊस झाला. या पावसाने आता खरीप पेरणीला वेग येणार आहे. जून महिन्यात सरासरी 108 मिलीमीटर पाऊस अपेक्षित आहे. यंदा रोहिणी आणि मृग नक्षत्राने निराशा केल्यामुळे शेतकरी चिंतातूर झाला.

मात्र, आर्द्रा नक्षत्राने बळीराजाला निराश केले नाही. एन्ट्रीलाच या नक्षत्राने जिल्हा ओलाचिंब केला. जिल्हाभरात जवळपास सायंकाळी पावसास प्रारंभ झाला. वादळी वारा नाही. विजांचा कडकडाट नाही. शांततेत रात्री उशिरापर्यंत पावसाच्या सरी सुरूच होत्या. राहाता तालुक्यात सर्वाधिक 44.9 मिलीमीटर पाऊस झाला.

शेवगाव तालुक्यात 37.7, नेवासा 35.5 नगर तालुक्यात 25.4 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. या महिन्यातील पहिल्याच जोरदार पावसाने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. आतापर्यंत पावसाअभावी खरीप पेरणी खोळंबली होती. या पावसामुळे खरीप पिकांच्या पेरणीला आता वेग येणार आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 84.6 मिलीमीटर पाऊस झाला होता. यंदा मात्र फक्त 35.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

तालुकानिहाय पाऊस मिलीमीटरमध्ये

नगर 25.4, पारनेर 14.8, श्रीगोंदा 19.1, कर्जत 12.5, जामखेड 7.6, शेवगाव 37.7, पाथर्डी 43.4, नेवासा 35.5, राहुरी 11.9, संगमनेर 10.2, अकोले 20.8, कोपरगाव 24.6, श्रीरामपूर 5.9, राहाता 44.9.

तीन मंडलांत अतिवृष्टी

शेवगाव महसूल मंडलात सर्वाधिक 88.5, मिलीमीटर पाऊस झाला. कोरडगाव मंडलात 68.3, वीरगाव मंडलात 65.3 मिलीमीटर पाऊस झाला. याशिवाय राहाता मंडलात 63.5, वडाळा मंडलात 62, नेवासा खुर्द मंडलात 62 मिलीमीटर पाऊस झाला आहे.

हेही वाचा

अहमदनगर एसटी महामंडळाची पंढरपूर वारी सुरू; तब्बल 400 बसचे नियोजन

शेवगाव दुहेरी हत्याकांडातील आरोपीला अटक; ‘एलसीबी’ने लावला गुन्ह्याचा छडा

अहमदनगर जिल्हा रुग्णालयात अनवॉन्टेड 316 @ गर्भपात

Back to top button