गोरक्ष शेजूळ
अहमदनगर : चुकून गर्भधारणा होणे, गर्भ खराब असणे, गर्भातील व्यंगामुळे माता असुरक्षित असणे आदी कारणांमुळे गर्भधारणा झालेल्या 316 महिलांचा गर्भपात जिल्हा रुग्णालयात गेल्या वर्षभरात करण्यात आला. याद्वारे एका अर्थाने 'त्या' मातांना सुरक्षित ठेवण्याचेच काम आरोग्य प्रशासनाने केले आहे. त्यात अत्याचारातून गर्भधारणा झालेल्या 11 पीडितांचाही समावेश असून, हा आकडा चिंता वाढविणारा आहे. तसेच, दाम्पत्याची इच्छा नसताना चुकून गर्भधारणा झाल्याने 283 महिलांचा गर्भपात वर्षभरात करण्यात आला. त्यामुळे गर्भनिरोधक साधनांचा वापर वाढविण्यासाठी आणखी प्रबोधनाची गरज व्यक्त होत आहे.
जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून 2022-23 या वर्षात अशा प्रकारे 316 गर्भपात करण्यात आले. त्यात 12 आठवड्यांपेक्षा लहान 253 आणि 12 आठवड्यांवरील 63 गर्भांचा समावेश होता. गर्भपात करण्यापूर्वी जिल्हा रुग्णालयातील स्त्रीरोग तज्ज्ञांकडून संबंधित महिलेची तपासणी केली जाते. सोनोग्राफीने गर्भ पाहिला जातो. तो 20 आठवड्याच्या आतील असेल, तरच तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्याने, कायदेशीर बाबी तपासून गर्भपात केला जातो. यामुळे मातांच्या जिवाचा संभाव्य धोका टळतोच, दोन पाळण्यांतील अंतर वाढविणे शक्य होते. मात्र असे असले तरी अशी गर्भपाताची वेळ येऊ नये यासाठी पती-पत्नीनेही आवश्यक ती काळजी घेतली पाहिजे, असे आवाहन जिल्हा रुग्णालयातून करण्यात येते. जिल्ह्यात 26 ग्रामीण रुग्णालये आहेत, मात्र स्त्री-रोगतज्ज्ञ आणि सुविधा असतील, तेथेच गर्भपात केला जातो.
सांसारिक जीवनात अनेकदा पहिले बाळ लहान असतानाच नकळत गर्भधारणा होण्याचे प्रकार घडतात. पहिल्या बाळाच्या निकोप वाढीसाठी असे दुसरे बाळ नकोच असते. त्यामुळे अशी गर्भधारणा झाल्यास गर्भपाताशिवाय पर्याय दिसत नाही. काही वेळा गर्भाची अपेक्षित वाढ नसल्याने मातांच्या जीवाला धोका संभावतो, त्यामुळेही गर्भ काढून टाकावा लागतो. कधी कधी गर्भातील बाळाला व्यंग असल्याचे निदर्शनास येते. मोठे किंवा उपचार होऊ न शकणारे व्यंग असल्यास तो गर्भ काढण्याचा एकमेव पर्याय दिसतो. याशिवाय अत्याचारातून गर्भधारणा होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे. मनोरुग्ण महिलेला गर्भ असणे, यातही कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करूनच गर्भपात केला जातो.
पाळणा लांबविण्यासाठी गर्भनिरोधक साधनांचा वापर करण्यासाठी आरोग्य यंत्रणेकडून नियमित जनजागृती केली जाते. त्यात गर्भनिरोधक गोळ्या, निरोध, 'कॉपर-टी' अशा साधनांचा वापर करण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, याकडे अनेकदा अपेक्षित लक्ष दिले जात नाही. विशेषतः पुरुषांना याबाबत फारसे गांभार्य नसते. त्यामुळे नको असताना गर्भ राहतो आणि गर्भपातासाठी महिलेलाच त्रास सहन करावा लागतो. याला पर्याय असलेल्या नसबंदीसाठीही पुरुष पुढाकार घेत नाही. तेथेही कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया महिलेचीच केली जाते. पुरुषांची कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्याबाबत आणखी प्रबोधनाची गरज व्यक्त होत आहे.
2022-23 मधील गर्भपात
चुकून गर्भधारणा : 283
मातेच्या जीवाला धोका : 2
अत्याचारातून गर्भधारणा : 11
बाळाला व्यंग : 23
गर्भनिरोधक म्हणून गोळ्यांचा उपयोग केला जात असताना आता अंतरा हे गर्भनिरोधक प्रकारचे एक इंजेक्शन उपलब्ध झालेले आहे. जोपर्यंत गर्भधारणा नको असेल, तोपर्यंत या इंजेक्शनचा वापर करता येतो. साधारणतः दर तीन महिन्यांच्या अंतराने हे एक इंजेक्शन घेणे त्यासाठी आवश्यक आहे. जिल्हा रुग्णालयात विनामूल्य हे इंजेक्शन मिळते, मात्र बाजारात ते दोनशे ते अडीचशे रुपयांपर्यंत घ्यावे लागू शकते, अशी माहिती डॉ.नीलेश गायकवाड यांनी दिली.
गर्भ खराब असणे, व्यंग असणे, गर्भाशयातील बाळात दोष असणे अशा कारणांनी गर्भपात केले जातात. प्रत्येक रुग्णाबाबत कारणे वेगवेगळी असतात. त्यांना कशाप्रकारे गर्भपात करायचा, गोळ्या, क्युरेटिंग याबाबत सल्ला दिला जातो. कायदेशीर बाबींची तपासणीही केली जाते.
-डॉ. नीलेश गायकवाड,
स्त्री-रोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय
हेही वाचा