अहमदनगर एसटी महामंडळाची पंढरपूर वारी सुरू; तब्बल 400 बसचे नियोजन | पुढारी

अहमदनगर एसटी महामंडळाची पंढरपूर वारी सुरू; तब्बल 400 बसचे नियोजन

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर यात्रेसाठी एसटी महामंडळ सज्ज झाले असून, अहमदनगर विभागाने भाविकांसाठी जवळपास 400 जादा बसचे नियोजन केले आहे. रविवारपासून तारकपूर बसस्थानकातून महामंडळाची पंढरपूर वारी सुरु झाल्याची माहिती विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ यांनी दिली. या वारीत 22 शिवशाही व 13 शयनयान बसचा समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. पंढरपूर यात्रेला जाणार्‍या भाविकांसाठी दरवर्षी एसटी महामंडळाच्या वतीने जादा बस सोडल्या जात आहेत.

सुखकर वारीसाठी भाविक देखील महामंडळाच्या बसला प्राधान्य देत आहेत. अहमदनगर विभागाची पंढरपूर वारी 25 जूनपासून सुरु होत असन, 4 जुलैपर्यंत वारी सुरु राहाणार आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 235, धुळे विभागाच्या 75 व जळगाव विभागाच्या 75 अशा एकूण 385 बसमधून भाविकांना पंढरपूरच्या पांडुरंगाचे दर्शन घडवून आणले जाणार आहे.

अहमदनगर येथील तारकपूर बसस्थानकातून बस पंढरपूरकडे मार्गस्थ होणार असून, भाविकांना विठ्ठल सहकारी साखर कारखान्यापर्यंत सोडण्यात येणार आहे. 385 बसमध्ये 22 शिवशाही आणि 13 शयनयान बसचा समावेश केला आहे. शेवगाव, पाथर्डी, जामखेड व श्रीगोंदा आगारांच्या बस माहिजळगावमार्गे पंढरपूर वारी करणार आहेत. गेल्या आषाढी एकादशीच्या तुलनेत यंदा भाविकांची संख्या वाढल्याचे दिसत आहे.

गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी 20 ते 25 बस सध्या पंढरपूरच्या दिशेने धावत आहेत. त्यामुळे यंदा जवळपास 400 जादा बस पंढरपूर वारी करण्याची शक्यता असल्याचे विभाग नियंत्रक सपकाळ यांनी सांगितले. जादा बसने पंढरपूर वारीसाठी जाणार्‍या महिला भाविकांना भाडे दरात 50 टक्के तसेच 75 वर्षांवरील अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत दिली जाणार आहे. सुखकर यात्रेसाठी महामंडळाच्या बससेवेचा लाभ घ्या, असे आवाहन त्यांनी केले.

हेही वाचा

Odisha Accident: गंजममध्ये भीषण बस अपघात; १० लोकांचा मृत्यू, ८ जखमी

भाजपमध्ये सातारा जिल्हा जिंकण्याचा दम नाही : शशिकांत शिंदे

पंढरपूर : अवैध वाळू उपशाने चंद्रभागेत खड्डेच खड्डे

Back to top button