पंढरपूर : अवैध वाळू उपशाने चंद्रभागेत खड्डेच खड्डे | पुढारी

पंढरपूर : अवैध वाळू उपशाने चंद्रभागेत खड्डेच खड्डे

पंढरपूर; पुढारी वृत्तसेवा :  ऐन आषाढी यात्रा सोहळ्याच्या तोंडावरच पंढरपुरातील चंद्रभागेच्या पात्रात अवैध वाळू उपशामुळे पडलेल्या खड्ड्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी हा प्रश्न ठळकपणे शासन आणि विरोधी पक्षांच्या निदर्शनास आणून दिल्याने आता विरोधी पक्षाची नेतेमंडळी याविरुध्द आक्रमक झाल्याचे दिसून येत आहे.

शनिवारी आमदार अमोल मिटकरी यांनी समाजसेवक गणेश अंकुशराव यांच्यासमवेत जाऊन प्रत्यक्ष चंद्रभागेच्या पात्रातील वाळू उपशामुळे पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांची पाहणी केली. आषाढी वारी सुरू झाली असून मोठ्या प्रमाणात पंढरीत भाविक दाखल होत आहेत. तरीही प्रशासनाने येथील खड्डेही बुजवलेे नाहीत आणि अवैध वाळू उपसाही रोखला नाही, असे निदर्शनास आल्याने आ. मिटकरी यांनी हा प्रश्न विधान परिषदेत उपस्थित करू आणि वारीकाळात जर या खड्ड्यांमुळे काही अनुचित प्रकार घडल्यास सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करू, असा इशारा आ. अमोल मिटकरी यांनी दिला आहे.

यावेळी महर्षी वाल्मीकी संघाचे संस्थापक अध्यक्ष गणेश अंकुशराव, राष्ट्रवादी काँग्रेसचे श्रीकांत शिंदे, आदित्य फत्तेपूरकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सुधीर भोसले, सतीश अभंगराव, सूरज पेंडाल, भागवत करकमकर यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Back to top button