अहमदनगर : ‘कचरा प्रक्रिया केंद्र’च कचर्‍यात ! शासकीय विश्रामगृह अन् बांधकाम पुन्हा चर्चेत! | पुढारी

अहमदनगर : ‘कचरा प्रक्रिया केंद्र’च कचर्‍यात ! शासकीय विश्रामगृह अन् बांधकाम पुन्हा चर्चेत!

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शासकीय विश्रामगृह वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत आहे. सूट नियोजनातील ढिसाळ व्यवस्थापनासह आता येथील कचरा व्यवस्थापनही कोलमडलेले दिसत आहे. लाखोंचा खर्च करून उभारलेले कचरा प्रक्रिया केंद्रच कचर्‍याच्या विळख्यात सापडल्याने कार्यकारी अभियंता व त्यांच्या टीमची अकार्यक्षमता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे.

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या शासकीय विश्रामगृह परिसरात स्वच्छतेचे तीन तेरा वाजले आहेत. कार्यकारी अभियंत्यांना ‘सूट’ शिवाय येथील अन्य कोणत्याही गोष्टीत विशेष रस नाही. येथील व्यवस्थापनही वरिष्ठांच्या आदेशानुसार पूर्णवेळ पाहुणचारात व्यस्त दिसतात. प्रशासनाच्या या दुर्लक्षामुळे ऐतिहासिक विश्रामगृह परिसरात ठिकठिकाणी कचरा पहायला मिळत आहे.

यातूनच काही वर्षांपुर्वी या ठिकाणी उभारलेले कचरा प्रक्रिया केंद्रालाही आज कचर्‍याने विळखा घातल्याचे उदासिन चित्र आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाने कचरा व्यवस्थापनासाठी लाखो रुपये खर्च करून विश्रामगृह परिसरात हे कचरा प्रक्रिया केंद्र उभारले होते. यात कचर्‍यावर प्रक्रिया करून गांडुळ खतासारखी निर्मितीचा हेतू होता. मात्र आज परिसरात पाहणी केली असता या कचरा प्रकल्पाचा उपयोग होताना दिसत नाही. संबंधित प्रक्रिया केंद्रालगतच अनावश्यक गवते, विखुरलेला कचरा निदर्शनास आल्याचे पहायला मिळत आहे.

हेही वाचा

अर्जुन उद्योग समूहाचे संतोष शिंदे यांनी पत्‍नी मुलासह जीवन संपवले

संगमनेर : संचालक गणेशला वैभव प्राप्त करून देतील : आमदार बाळासाहेब थोरात

राहुरी : बारागाव नांदूर ग्रामपंचायतीचा बिगुल वाजला

Back to top button