‘बिपरजॉय’ने स्वप्नावर फिरले पाणी; कोळगावातील शेतकरी चिंतातूर | पुढारी

‘बिपरजॉय’ने स्वप्नावर फिरले पाणी; कोळगावातील शेतकरी चिंतातूर

कोळगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : जून महिना संपत आलेला असताना पावसाने ओढ दिल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सध्या खरीप हंगामात कुठल्याही पिकाची पेरणी झाली नाही. खरीप हंगामापूर्वी शेतीची मशागत करूनही पाऊस नसल्याने शेतकरी काळजीत पडला आहे. यंदाच्या वर्षी बळीराजाला वेळेवर पावसाची आशा लागली असताना बिपरजॉय चक्रीवादळाने शेतकर्‍यांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. परिणामी पावसाचे कुठलेही चिन्ह दिसत नाही.

त्यामुळे शेतकरी खरीप हंगाम वाया जातो की काय? या चिंतेने शेतकरी ग्रासला आहे. मूग, मटकी, बाजरी, सोयाबीन, तूर, हूलगा आदी पिकांची पेरणी कोठेही होऊ शकलेली नाही. खते दुकानदारांनी बियाणे व खतांचा साठा करून ठेवलेला आहे. परंतु, पाऊस नसल्याने शेतकरी बीयाणे विकत घेऊ शकत नाही. त्यामुळे दुकानदारही अस्वस्थ झाले आहेत. हवामानाचे अंदाज सातत्याने चुकत असल्याने पाऊस कधी येणार हा सर्वांच्या चिंतेचा विषय बनला आहे.

उन्हाळ्याच्या तीव्र झळाना व तापमानाला तोंड देताना पाणी टंचाईलाही नागरिक तोंड देत आहेत. वेळेवर पाऊस झाला नाही, तर पाणी टंचाईची भीषण समस्या सर्वत्र निर्माण होऊ शकते. हवामान अंदाजानुसार जर पुढील आठवड्यापर्यंत पाऊस झाला नाही तर यंदाचा खरीप हंगाम हा शेतकर्‍यांच्या हातातून जाऊ शकतो व नागरिकांना तीव्र पाण्याच्या टंचाईला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे शेतकरी आभाळाकडे लवकर पाऊस पडेल या आशेने डोळे लावून बसला आहे व पंढरपूरच्या पांडुरंगाला मनोमन साकडे घालत आहे.

पाऊस लांबल्याने भाजीपाला महागला

भाजीपाला महाग झाल्याने व पिकांना पाणी देण्यासाठी पुरेसे पाणी नसल्याने शेतकरी, व्यापारी व ग्राहक महागाईला बळी पडत आहेत. वांगी, गवार, मिरची, टोमॅटो, कोथंबीर इत्यादी भाजीपाल्यांचे भाव कडाडले आहेत.

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या

पाऊस लांबल्याने खरीप हंगामाच्या पेरण्या खोळाबल्या आहेत. नेवासा तालुक्यातील गेवराई परिसरातील शेतकरीराजाचे डोळे निळ्या आभाळाकडे लागले आहेत. मागील वर्षी जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दमदार पाऊस पडल्याने बळीराजाने कापशी, बाजरी, मूग, उडीद, तूर, भुईमूग आदींची पेरणी केली होती. परंतु, यंदा जून महिन्यचा पंधरावाडा उलटूनही वरुणराजाने हजेरी न लावल्यामुळे शेतकरी हवालदिल, तसेच निराश झाला आहे.

एप्रिल, मे महिन्यात शेतकर्‍यांनी शेतीची मशागत करून ठेवली आहे. मात्र, पाऊस यंदा नसल्याने पेरण्या राहिल्या आहेत. खते -बियाणे खरेदीसाठी बँका, तसेच सोसायटी, पतसंस्थांमध्ये शेतकर्‍यांनी सोने गहाण ठेवले असून, पावसाने मात्र पाठ फिरवल्याने शेतकर्‍यांची चिता वाढली आहे. तसेच, मागील वर्षीचा कापूस अजून तसाच घरामध्ये भाववाढीच्या आशेवर पडून आहे. त्यात यंदाही पावसाने दांडी मारल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यामुळे संपुर्ण वर्षभराचे आर्थिक नियोजन बिघडणार आहे.

खरीप हंगामाच्या दृष्टीने शेतकर्‍यांनी पुर्वतयारी झालेली आहे. परंतु, पावसाअभावी जिरायती क्षेत्रावरील पेरण्या खोळंबल्या आहेत. तरी शेतकर्‍यांना कृषी विभागाने सांगितले आहे की, पेरणीयोग्य जमीन पूर्ण ओली झाल्याशिवाय जिरायती शेतकर्‍यांनी पिकांची पेरणी करू नये. अर्धवट ओलीवर पेरणी केल्यास बियाणे उगवण कमी होऊन त्यातून नुकसान होण्याची शक्यता असते.

हेही वाचा

सांगलीत ईडीकडून छापेमारी; त्रिकोणी बाग परिसरात झाडाझडती

मढी : फळबागा टाकू लागल्या माना ..! पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचा टँकरने पाणीपुरवठा

Darshana Pawar Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

Back to top button