मढी : फळबागा टाकू लागल्या माना ..! पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचा टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

मढी : फळबागा टाकू लागल्या माना ..! पाऊस लांबल्याने शेतकर्‍यांचा टँकरने पाणीपुरवठा

शिवदास मरकड

मढी (अहमदनगर) : जून महिना संपत आला तरी अद्यापही पाऊस पडला नाही. पावसाच्या भराशावर डाळिंब, सीताफळ व संत्रा फळबाग धरल्यामुळे पाऊस न झाल्याने परिणाम किती गंभीर होऊ शकतो, याची प्रचिती सध्या पाथर्डी तालुक्यातील शेतकरी अनुभवत आहेत. मढी, निवडूंगे, धामणगाव, घाटशिरस, माळीभाबुळगाव परिसरातील डाळिंब उत्पादक शेतकरी फळबाग वाचवण्यासाठी टँकरने पाणीपुरवठा करत आहेत. मुलांची शाळेतील फी भरवायची का? विकतचे पाणी घेऊन फळबाग जगवायची?, असा मोठा प्रश्न शेतकर्‍यांपुढे उभा ठाकला आहे.

लाखमोलाच्या फळबागा वाचवण्यासाठी शेतकर्‍यांनी सर्वस्व पणाला लावले असून, परिसरात सुमारे एक हजार टँकरने दरोरज फळबागांना पाणीपुरवठा सुरू आहे. पाथर्डी तालुक्यातील मढी, निवडूंगे, धामणगाव, करडवाडी, शिरापूर, माळीभाबुळगाव परिसरात मोठ्या प्रमाणात फळबागाचे क्षेत्र आहे.

राज्यातील विविध हवामान अभ्यासाकांनी सुरुवातीला चांगला पाऊसपडण्याची शक्यता वर्तवली होती. त्यांच्या भरोशावर लाखो रुपये खर्च करून शेतकर्‍यांनी डाळिंबाचा पावसाळी बहार धरला. जमेल त्या पद्धतीचे नियोजन करून फळबागा व खरीप पेरणीसाठी कंबर कसली. मात्र, जून महिना संपत आला तरीही पावसाचा पत्ता नसल्याने मागील आठवड्यापासून या गांवामध्ये शेतकरी टँकरद्वारे पाणी खरेदी करून डाळिंब, संत्रा, सिताफळ बागेला पाणी देत आहेत.

तालुक्यात बहुतांश शेतकरी मे आणि जून महिन्यात डाळिंबाचा हंगाम धरतात. यावर्षी अनेक शेतकर्‍यांनी मे महिन्यात जेमतेम पाण्यावर फळबागेचा बहार थरला; मात्र पावसाने दडी मारल्याने बागांना अपेक्षित कळी निघाली नाही. ज्या बागेंना कळी निघाली ती पाण्याअभावी गळून जात आहे. भरपूर पाऊस झाला असता तर बागा टरारून फुटल्या असत्या. त्यामुळे डाळिंब बागांचे मोठे नुकसान होत असून, लाखो रुपयांचा खर्च वाया जाण्याची भीती शेतकर्‍यांमध्ये आहे.

परिसरातील विहिरींनी तळ गाठला

डाळिंब संत्रा व सिताफळ बागा टँकरच्या पाण्यावर जगविण्याची धडपड शेतकरी करत आहेत. कुणी टँकरने पाणी आणून देत आहे, तर कुणी दिवसभरात मिळणार्‍या उपशाचे पाणी बागेला देत आहे. ज्यांच्या बागेत बहार धरला त्यात आता फळ व फुलगळ होत आहे. वाढलेल्या उष्णतेमुळे पाण्याची गरज भागवणे शेतकर्‍यांना हाताबाहेर गेले आहे. परिसरातील विहिरींनी तळ गाठला असून, दिवसेंदिवस पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढत चालले आहे.

टँकरचे दर 500 ते 800 रुपये

दोन हजार लिटर पाण्याच्या टँकरचे दर 500 ते 800 रुपये असून, पावसाचा विलंब होत असल्याने टँकरची दरवाढ दिवसेंदिवस होत आहे.

पारा 40 अंशावर पोचला

तालुक्यात काही भागातच पाणी उपलब्ध असल्याने मिळेल तिथून पाणी उपलब्ध करत आहेत. मढी निवडूंगे धामणगाव परिसरातील फळबागांची स्थिती चिंताजनक असून, फळबागांसाठी मदत करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली. दररोज उन्हाची तीव्रता वाढत आहे. पारा 40 अंशावर पोचला असून, पाण्याची गरज वाढत आहे.

पावसाला उशीर झाल्याने डाळिंब बागेत बहार धरल्याने पाण्याअभावी त्याची फुलगळ होत आहे. मुलांची शाळेतील फी भरवायची का? विकत पाणी घेऊन फळबाग जगवायची? कर्ज काढून फळबागांना टँकरद्वारे पाणी देत आहे. फी नाही भरली तर मुंलाचे नुकसान, बागांना पाणी नाही सोडले तर फळबागांचे नुकसान, शेतकर्‍यांनी जगावं तरी कसं?, फळबागांचे विमा व नुकसान तातडीने मिळावे.

-श्रीधर वायकर, शेतकरी, माळीबाभूळगाव

टँकरद्वारे विकतचे पाणी विहिरी टाकून ठिबकद्वारे फळबागांना पाणी सोडले जाते. मात्र, दिवसभरात अनेक वेळा वीज गायब होत असल्याने पाणी विकत घेऊन ही पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याने विहिरीत टाकलेले पाणी बागेला सोडता येत नाही, असे दुहेरी संकट असून, पूर्ण दाबाने वीज सोडून फळबागांना पाणी उपलब्ध करून द्यावे.

– अशोक मरकड,
शेतकरी, निवडूंगे

हेही वाचा

नाशिक : मृग कोरडा गेल्याने बळीराजाच्या नजरा आकाशाकडे, पावसाची प्रतीक्षा

हात-पायही हलवता येणार नाही, असे तिचे घर!

Darshana Pawar Murder : दर्शना पवारच्या लग्नाच्या तयारीमुळे राहुल चलबिचल

Back to top button